Join us  

LED दुभाजकाने बोरिवलीच्या सौंदर्यात पडली भर, पालिकेची मुंबईतील पहिली नावीन्यपूर्ण योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 9:43 PM

मुंबईतील रस्त्यांच्या दुभाजकावर भविष्यात मुंबईकरांना आता एलईडी लाईट्स दिसतील.

- मनोहर कुंभेजकरमुंबईः मुंबईतील रस्त्यांच्या दुभाजकावर भविष्यात मुंबईकरांना आता एलईडी लाईट्स दिसतील. एलईडी दुभाजकाने बोरिवलीच्या सौंदर्यात भर पडली असून, पालिकेची मुंबईतील पहिली नावीन्यपूर्ण योजना आहे. आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक पालिका आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली सहा.अभि.परिरक्षण याची राजेश अक्रे यांनी ही भरीव कामगिरी केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर आज सायंकाळपासून सुरू झालेली ही योजना आर मध्य वॉर्डमध्ये अन्य भागात सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी  दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात गेल्या जानेवारी महिन्यात घेतलेल्या पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि 24 सहाय्यक आयुक्त यांच्या बैठकीत काही नावीन्यपूर्ण करा, अश्या सूचना केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार बोरिवली रेल्वे स्थानक पश्चिम ते गोराई या सात ठिकाणी असलेल्या रस्त्यांच्या दुभाजकांवर एलईडी लाईट्स बसवण्यात आल्या आहेत. यामुळे बोरिवलीच्या सौंदर्यात भर पडली असून,मुंबई महानगरपालिकेची ही पाहिली योजना असल्याची माहिती आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक पालिका आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांनी लोकमतशी बोलताना दिली. याप्रकरणी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मोलाचे प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले. एलईडी लाईट्समुळे आता रात्रीच्या वेळी दुभाजकावर अपघात होणार नाही, मात्र नागरिकांनी वाहने चालवताना येथील एलईडी लाईट्सची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. कापसे यांनी लोकमतशी बोलताना केली.