Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेक्चरला प्राध्यापकांचीच दांडी , मुंबई विद्यापीठ; एलएलएमच्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 03:12 IST

मुंबई विद्यापीठाने एलएलएमच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रविवारी लेक्चर ठेवले होते, पण ६ गु्रप्सपैकी २ गु्रप्सचे लेक्चर घ्यायला प्राध्यापकच आले नाहीत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने एलएलएमच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रविवारी लेक्चर ठेवले होते, पण ६ गु्रप्सपैकी २ गु्रप्सचे लेक्चर घ्यायला प्राध्यापकच आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला. दुपारी २ वाजता विद्यार्थी लेक्चरला फोर्ट कॅम्पसमध्ये पोहोचले, पण ४ वाजेपर्यंत प्राध्यापक न आल्याने विद्यार्थी निराश होऊन घरी परतले.मुंबई विद्यापीठाने एलएलबी आणि एलएलएमचे निकाल उशिरा लावले. त्यामुळे एलएलएमची प्रवेश प्रक्रिया लांबली. जानेवारी महिन्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू होती. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते न होते, तो विद्यापीठाने परीक्षा जाहीर केल्या. पहिल्यांदा विद्यापीठाने १७ जानेवारी रोजी परीक्षा जाहीर केल्या होत्या. त्या वेळी विद्यार्थ्यांनी या परीक्षांना विरोध केला. त्यानंतर, विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या ५ दिवसांनी परीक्षा पुढे ढकलल्या. आता एलएलएमच्या परीक्षा २३ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. यालाही विद्यार्थ्यांनी विरोध केला असून, परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे.एलएलएमचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रविवारी लेक्चर ठेवले होते, पण या लेक्चरला प्राध्यापकांनीच दांडी मारल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. आता विद्यापीठाने सोमवारपासून २२ जानेवारीपर्यंत दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत लेक्चर्स ठेवले आहेत. त्यानंतर, २३ जानेवारीपासून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायचे आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ