Join us

दिल्लीला जाण्यापूर्वी हवालाद्वारे जानला मिळाले दीड लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST

एटीएसकडून तपास सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेला दहशतवादी जान मोहम्मद शेख हा ...

एटीएसकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेला दहशतवादी जान मोहम्मद शेख हा राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या जाकीर शेख याच्या संपर्कात होता. जेव्हा जान मोहम्मद शेख याला दिल्लीला जाण्याचे निर्देश आले, त्यावेळी त्याला दीड लाख रुपये हवाल्याच्या माध्यमाने पाठवण्यात आले होते. यातील २५ हजार रुपये जाकीर शेखला दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

धारावीतील रहिवासी जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालिया याच्यासह सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केल्यानंतर एटीएसही ॲक्शन मोडमध्ये आले आहे. एटीएसने गुन्हा दाखल करून जाकीर हुसेन आणि रिझवान मोमीन यांंना अटक केली. जोगेश्वरीतील बेहराम बागमध्ये राहण्यास असलेला जाकीर रिक्षाचालक म्हणून काम करायचा. तो दाऊद गँगसाठी काम करत असून, त्याच्याविरोधात मुंबईत खंडणी मागितल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. जाकीर अँथोनी नावाच्या व्यक्तीशी बोलत होता. अँथोनीच्या वतीने जाकीर शेख हा भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा माणसांची निवड करत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत एटीएस अधिक तपास करत आहेत. जानकडून मिळालेल्या रकमेबाबत जाकीरकडे अधिक तपास सुरू आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आणखी कितीजण आहेत? याबाबत एटीएस अधिक तपास करत आहेत.

मोबाईलसह डीएनए सॅम्पल फॉरेन्सिककडे

जानला अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच जाकीरने मुंब्रा येथील रिझवानशी संपर्क साधला. तेव्हा रिझवानने मोबाईलमधील तपशील डिलीट करण्यास सांगितला. त्याला तो न जमल्याने त्याने मोबाईल रिझवानकडे दिला. त्याने तो मोबाईल तोडून घराजवळच्या नाल्यात फेकला. एटीएसच्या पथकाने तीन तुकड्यांमध्ये तो मोबाईल मिळवला असून, तपासणीसाठी फॉरेन्सिकला पाठवला आहे. तसेच एटीएसने जाकीर आणि रिझवान यांचे डीएनए सॅम्पल घेतले असून, ते फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविणार असल्याची माहिती समजते आहे.