Join us  

जगाची भाषा शिका, पण मायमाऊलीचे काय? राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 12:52 PM

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा व राष्ट्रीय भाषा शिकण्यास प्रेरित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणाला महत्व देण्यात आले असल्याचे नमूद करून पालक तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा व राष्ट्रीय भाषा शिकण्यास प्रेरित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे.  

मुंबईतील व्हिला टेरेसा हायस्कूलचा वर्धापन दिन तसेच पुरस्कार वितरण राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी शाळेच्या सभागृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन आदी जागतिक भाषा अवश्य शिकाव्यात, परंतु त्यांना मातृभाषा तसेच राष्ट्रभाषेत बोलण्यासही प्रोत्साहन दिले गेले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.  

शाळा व महाविद्यालयांमध्ये उल्लेखनीय परिवर्तन घडत असून जवळजवळ ९० टक्के शिक्षक महिला आहेत. विद्यापीठांमध्ये ४० पैकी ३५ सुवर्ण पदके विद्यार्थिनी मिळवित आहेत. आगामी काळात नर्सिंग क्षेत्राप्रमाणे अध्यापन कार्यात महिला शिक्षकांचे प्रमाण १०० टक्के होईल. महिलांनी आता केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अध्यापनाचे कार्य स्वीकारून भारताला विश्वगुरू होण्यास मदत करावी असे राज्यपालांनी सांगितले.  पर्यावरण रक्षण  देशापुढील आव्हान असून युवा पिढीने पर्यावरण  रक्षणाचा संकल्प करावा, असे त्यांनी सांगितले.

छंदामुळे आपण तणावमुक्त राहतो

छंदांचे महत्व विशद करताना विद्यार्थ्यांनी चित्रकला, संगीत, खेळ यापैकी कुठलाही छंद जोपासावा कारण त्यामुळे इतर विषयांचे चांगले होते व तणावमुक्त होण्यास मदत मिळते असे राज्यपालांनी सांगितले. कार्यक्रमाला राज्य सरकारच्या बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशी शाह,  सेंट टेरेसा हायस्कूलच्या प्राचार्या सिस्टर बबिता अब्राहम, सिस्टर संजीता कुजूर, प्रशासन अधिक्षिका सिस्टर लिमा रोज पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

टॅग्स :रमेश बैस