Join us  

प्रदर्शनातून माहिती करून घ्या वायूदलाची, 'गार्डियन्स ऑफ द स्काइज'चं मुलुंडमध्ये आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 12:32 PM

वायूदलाचं काम कसं चालतं ? किंवा त्यांची प्रात्यक्षिकं कशी सादर होतात ? याबद्दलचं आकर्षण सगळ्यांनाच आहे. प्रात्यक्षिकं सादर करताना दिसणारी शिस्तबद्धता कशी पाळली जाते, याबद्दलही जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. पण आता या सगळ्याची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून करता येणार आहे.

मुलुंड- वायूदलाचं काम कसं चालतं ? किंवा त्यांची प्रात्यक्षिकं कशी सादर होतात ? याबद्दलचं आकर्षण सगळ्यांनाच आहे. प्रात्यक्षिकं सादर करताना दिसणारी शिस्तबद्धता कशी पाळली जाते, याबद्दलही जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. पण आता या सगळ्याची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून करता येणार आहे. 

महाराष्ट्र सेवासंघ (एमएसएस) या सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थेने 'वायू-शक्ती' या तीन दिवसाच्या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. भारतीय हवाई दल, मेरीटाइम एअर ऑपरेशन्स, मुंबई यांच्या सहकार्याने हे खास प्रदर्शन सुरू झालं आहे. एमएसएसच्या 'सॅल्युट इंडिया मिशन' या उपक्रमाचा भाग म्हणून या प्रदर्शनात वायूदलाचे सामर्थ्य अनुभवता येईल. या प्रदर्शनात रडार्स, मिसाइल लॉचंर्स, फायटर एअरप्लेन मॉडेल्स, ट्रान्सपोर्ट प्लेन्स, जी-सूट्स असे विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान आणि विंटेज एअरक्राफ्ट अशा विविध विषयांची माहिती मिळते आहे. तसंच तरुणांसाठी खास करिअर मार्गदर्शनसत्र आहे. ड्रोन्स आणि सिम्युलेटर्सचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिके, एरो-मॉडेलिंग विषयाची माहिती अशी अनेक वैशिष्ट्यं इथे आहेत. 

 

प्रदर्शनाचा भाग म्हणून महाराष्ट्र सेवा संघाने शाळा आणि सामान्य जनतेला वायूदलाशी संबंधित पोस्टर्स, प्रेझेंटेशन, तक्ते, चित्रे, लेख, व्हिडिओ, निबंध, आर्ट इन्स्टॉलेशन आणि मॉडेल्स पाठवण्याचे आवाहन केलं आहे. यातील विजेत्या स्पर्धकांना प्रदर्शनात समाविष्ट करून घेतलं जाईल. मात्र, हे साहित्य वेळेत उपलब्ध होणं आणि जागेची उपलब्धता यावर अवलंबून असेल. 

मुंबईतील मुलुंड पूर्व येथील वामनराव मुरांजन हाय स्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये १० ते १२ नोव्हेंबर २०१७ या काळात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. नोंदणी केलेल्या शालेय विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन १० नोव्हेंबर रोजी ११ ते ५ आणि ११ नोव्हेंबर रोजी ९ ते ५ या वेळेत विविध बॅचेसमध्ये पाहता येईल. सामान्य जनतेसाठी १० आणि ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ आणि १२ नोव्हेंबर रोजी ११ ते ४ या वेळेत हे प्रदर्शन खुलं असेल. हे प्रदर्शन मोफत असून सर्वांसाठी खुलं आहे. शालेय विद्यार्थ्यांचे गट पूर्वनोंदणीसह सहभागी होऊ शकतात.

आपल्या 'सॅल्युट इंडिया' उपक्रमाचा भाग म्हणून नागरिकांमध्ये देशप्रेम, नागरी मुल्यं आणि देशाच्या संरक्षण दलाविषयी आदराची भावना जागवण्याची मोहीम एमएमएसने हाती घेतली आहे. यासाठी सामान्य नागरिकांना थेट संरक्षण दलांशीच जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे. मागील वर्षी पहिल्यांदाच भारतीय नौदालाचे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.