Join us

दुर्मीळ वनस्पतींची माहिती मिळेल राणीच्या बागेत, २०० विद्यार्थ्यांनी घेतले वनस्पती शास्त्राचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2023 13:02 IST

कॉलेज तरुणांचाही उद्यानाकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईकरांचे आवडते आणि विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे भायखळा येथील राणीची बाग होय. या राणीच्या बागेत प्राण्यांसोबत विविध प्रजातींची झाडेही आहेत. माटुंगा आणि घाटकोपर येथील शालेय विद्यार्थ्यांनी सोमवारी राणीच्या बागेला भेट दिली व विविध दुर्मीळ वनस्पतींबद्दलची माहिती मोठ्या कुतूहलाने जाणून घेतली.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय मुंबईकरांचे सहलीचे आवडते ठिकाण असून, उद्यानातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी व प्राणिसंग्रहालयातील निरनिराळे प्राणी पाहण्यासाठी शनिवार, रविवारी  याठिकाणी प्रचंड गर्दी असते. या उद्यान व प्राणिसंग्रहालयातील विविध प्रकारची झाडे, झुडपे, फुलझाडे, दुर्मीळ वनस्पती, देशी-परदेशी प्रजातीची फुले आणि फळझाडे आदींचा अभ्यास करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात. सोमवारी साउथ इंडियन इज्युकेशन सोसायटीच्या घाटकोपर आणि माटुंगा येथील दोन शाळेच्या एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह बागेतील जपानी उद्यानाला भेट दिली. या उद्यानातील विविध रोपांची, झुडपांची, झाडांची माहिती जाणून घेतली.

कॉलेज तरुणांचाही उद्यानाकडे कल

राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी उद्यानविद्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी राणीच्या बागेत येत असतात. काही विद्यार्थी वनस्पतीशास्त्राचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास करण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानाची निवड करीत आहेत. निसर्गसंपदा आणि विविध वनस्पतींच्या प्रजाती एकाच ठिकाणी अभ्यासाला मिळत असल्याने या विद्यार्थ्यांची अभ्यासाविषयक रुची वाढत आहे. 

टॅग्स :मुंबई