Join us

लिड: विना मास्क कारवाईसाठी पोलिसांना २५ हजार रूपयांचे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालिकेकड़ून विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू असताना, आता पोलीसही त्यांच्या दिमतीला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालिकेकड़ून विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू असताना, आता पोलीसही त्यांच्या दिमतीला उतरले आहेत. यात पालिकेचे दंड वसूल करणारे पुस्तक पोलिसांच्या हाती देण्यात आले आहे. त्यानुसार चौकाचौकात उभे राहून पोलीसही रविवारपासून कारवाई करताना दिसून आले.

प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत ५ पुस्तकांचे टार्गेट देण्यात आले आहेत. मुंबईतल्या एकूण ९४ पोलीस ठाण्यात हे पुस्तक देण्यात आले असून, दिवसाला २५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्याचे टार्गेट प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत देण्यात आले आहे.

मुंबईत २० मार्च २०२० ते २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुंबई पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ११ हजार ७१५ गुन्हे नोंद केले आहेत. यात, कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केल्यामुळे पालिकेकड़ून विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू आहे. त्यात क्लिनअप मार्शलही ठिकठिकाणी तैनात आहेत.

यातच विविध बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या हातात पालिकेचे दंड वसूल करणारे पावती पुस्तक देत त्यांना कारवाईसाठी रिंगणात उतरविण्यात आले आहेत. रविवार असल्याने नागरिकांची गर्दी कमी होती. अशात पोलिसांची धांंदल उडाली. रात्री ९ वाजेपर्यंत याचा अहवाल वरिष्ठांना द्यायचा असल्याने हातात बुक घेऊन कुठे थांबायचे? असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसला. मुंबई पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या आदेशाने ही कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नाकावरचा मास्क खाली आला तरी नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांबरोबर पोलीसही रस्त्यावर कडक कारवाईसाठी उतरले आहेत.

.....

पालिकेने एका दिवसात वसूल केला ३२ लाख दंड

पालिकेने शनिवारी १६ हजार १५४ विनामास्क

व्यक्तिंवर प्रत्येकी २०० रुपये दंडानुसार, एकूण ३२ लाख ३० हजार ८०० एवढी दंड वसुली करण्यात आली आहे.

....