Join us  

विधि महाविद्यालयातील जागा वाढणार; तुकडी संख्येत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:56 AM

विधि शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने, विधि अभ्यासक्रमांसाठीच्या महाविद्यालयाच्या तुकडी संख्येत उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विधि महाविद्यालयातील जागा वाढणार आहेत.

- सीमा महांगडेमुंबई : विधि शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने, विधि अभ्यासक्रमांसाठीच्या महाविद्यालयाच्या तुकडी संख्येत उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विधि महाविद्यालयातील जागा वाढणार आहेत.२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील ३ व ५ वर्षांच्या विधि पदवी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या तुकड्यांची कमाल मर्यादा ५ इतकी राहणार आहे, तर पुढील वर्षाच्या तुकड्यांना नैसर्गिक वाढीचे तत्त्व लागू राहणार असल्याचा शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला. या अनुषंगाने ५ वर्षे अभ्यासक्रमाच्या एकूण तुकड्यांची कमाल मर्यादा २५ तर ३ वर्षे अभ्यासक्रमाच्या तुकड्यांची कमाल मर्यादा १५ इतकी असेल. यामुळे महाविद्यालयातील जागा वाढणार असल्याचे मत व्यक्त करीत महाविद्यालयांनी समाधान व्यक्त केले.२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व विधि अभ्यासक्रमांसाठी प्रति तुकडी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली. त्यानुसार, सर्व विधि पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता प्रति तुकडी ६० विद्यार्थी अशी यापुढेही कायम राहील. महाविद्यालयातील कमाल तुकडी मर्यादा २० असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी क्षमता, यामुळे ६० *२० = १२०० इतकी झाली. या आधी ती ८० प्रमाणे १,६०० इतकी होती. यामुळे महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्येत आधीपेक्षा घट झाली आणि महाविद्यालयाकडून ती पूर्ववत करण्याची मागणी जोर धरू लागली. त्याचसोबत, काही नामांकित महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असल्याने, अशा महाविद्यालयातील जागा वाढविण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली. मात्र, महाविद्यालयांची कमाल २०ची तुकडी मर्यादा लक्षात घेता, ते अशक्य असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :शैक्षणिक