दीपक मोहिते, वसईनालासोपारा शहरात दिवसाढवळ्या भरवस्तीत एका बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही याच भागात अशा प्रकारच्या अनेक हत्या घडल्या आहेत. नालासोपारा शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. आजवर झालेल्या या हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचे दिसून येते. या शहरात अनधिकृत बांधकामांचे पीक आले असून भूमाफियांच्या आपापसांतील हेव्यादाव्यांमुळे अशा घटना वारंवार घडत असतात. पोलीस यंत्रणेला या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आजवर शक्य झाले नाही. नालासोपारा पूर्वेस वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांनी या परिसरात नवे पोलीस ठाणे उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे. परंतु, गृहखात्याने अद्याप त्याबाबत कार्यवाही केली नाही. शहरातील गुन्ह्यांमध्ये गेल्या १० वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. हत्या, ज्वेलर्सवर दरोडे, बलात्कार, महिलांची मंगळसूत्रे पळवणे, बँकांची कॅश लुटणे व गटागटांमध्ये हाणामाऱ्या अशा घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. काल ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली, ती व्यक्तीही जमिनीच्या व्यवहारामध्ये गुंतलेली होती. सकाळी ११.३० ते १२ वा.च्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी राजेश सिंग यांची हत्या केली. सिंग यांची ओळख भूमाफिया म्हणून होती. काही वर्षांपूर्वी त्यांनी वसईचे तत्कालीन तहसीलदार अनंत संखे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकवले होते. काल झालेल्या या घटनेने पोलीस यंत्रणेसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. यापूर्वी प्रवीण धुळे यांची हत्याही अशा पद्धतीने झाली होती. या शहरात घडलेल्या अनेक घटनांतील आरोपींचा छडा लावणे पोलिसांना शक्य झालेले नाही. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यामुळे नागरिकांनी आचोळे भागात अतिरिक्त पोलीस ठाणे उभारण्यात यावे, अशी मागणी केली होती. परंतु, त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही राज्यातील गृहखात्याकडून झालेली नाही. मध्यंतरी नालासोपारा पश्चिमेस सायंकाळी ५ वा.च्या सुमारास अज्ञात इसमांनी एका बँकेची ३ कोटींची लूट केली. याही प्रकरणातील आरोपी हुडकणे पोलिसांना जमलेले नाही.
कायदा, सुव्यवस्था नालासोपा-यात ढासळली?
By admin | Updated: November 6, 2014 23:30 IST