Join us

मुंबईत कलर कोडिंग सिस्टीमला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:05 IST

पोलीस आयुक्तांनी घेतला आढावा, नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहनमुंबईत ‘कलर कोडिंग’ प्रक्रियेस सुरुवातअत्यावश्यक सेवेसाठीच्या खासगी गाड्यांवर ...

पोलीस आयुक्तांनी घेतला आढावा, नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबईत ‘कलर कोडिंग’ प्रक्रियेस सुरुवात

अत्यावश्यक सेवेसाठीच्या खासगी गाड्यांवर वापर; पोलीस आयुक्तांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, रस्त्यावरील वाहनांची गर्दी राेखण्यासाठी मुंबई पोलिसांकड़ून रविवारपासून खासगी वाहनांसाठी कलर कोडिंग लागू करण्यात आले आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुलुंड, आनंद नगर, दहिसर टोल नाका परिसरात फिरुन आढावा घेतला. अत्यावश्यक सेवेसाठीच्या खासगी वाहनांवर स्टिकर लावून नागरिकांना या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातूनही कलर कोडिंगबाबत जनजागृती सुरू केली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी लाल रंगाचे, भाजीपाल्याच्या वाहनांसाठी हिरव्या, तर सरकारी तसेच अन्य महत्त्वाच्या व्यक्तींसाठी पिवळ्या रंगाचे स्टिकर बंधनकारक करण्यात आले आहेत.

या स्टिकरचा गैरवापर होत नाही ना, याची पाहणी मुंबई पोलिसांकड़ून करण्यात येईल. याचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. मुंबईतल्या सर्व टोलनाक्यांवर शनिवारी रात्रीपासून पोलिसांकड़ून स्टिकर लावण्यास सुरुवात करण्यात आली. रविवारी सकाळी पोलीस आयुक्तांनी दहिसर, मुलुंड, आनंद नगर टोलनाका परिसरात स्वतः हजर राहून वाहनांवर स्टिकर लावले.

* कुठे मिळणार स्टिकर?

रंगीत स्टिकर नेमके कुठे उपलब्ध होणार, याबाबत माहिती देताना, पाेलीस आयुक्तांनी सांगितले की, नागरिकांनी स्वतः प्रिंट करून सहा इंच व्यासाचे स्टिकर खासगी वाहनांवर चिटकवावेत, अन्यथा पोलीस विनामूल्य ते चिटकवून देतील.

* नियम फक्त मुंबईपुरताच वैध

कलर कोडिंगचा नियम हा फक्त मुंबईपुरता वैध राहणार असून, ठाणे, मिरा-भाईंदर, नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी त्यांचे नियम काढावेत. त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू, असे पाेलीस आयुक्त नगराळे यांनी सांगितले.

....................