Join us  

स्वर्गीय अरुण जेटली यांचे देशासाठी अन् पक्षासाठी खूप मोठे योगदान- मंगल प्रभात लोढा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 10:05 PM

माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या पुण्यतिथीदिनी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते अरुण जेटली यांच्या पुतळ्याचे अनावरण

मुंबई: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील पेडर रोडवरील अरुण जेटली चौक येथील डॉक्टर हाऊसच्या बाजूला अरुण जेटली यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या पुतळ्याचे अनावरण केले.

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या चौथ्या पुण्यतिथीदिनी, त्यांचे आणि त्यांच्या कार्याचे देशभरात स्मरण केले जात आहे. देशाच्या राजकारणातील एक उत्तम वक्तृत्व असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी विविध पदे भूषवलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील पेडर रोड येथे, ज्याठिकाणी अरुण जेटली नेहमी येत असत, त्यापरिसरात असलेल्या चौकात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री लोढा यांनी केले. या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मंत्री लोढा यांनी अरुण जेटली यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

स्वर्गीय अरुण जेटली यांचे देशासाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी खूप मोठे योगदान असून, देशातील पुढच्या पिढ्यांना जेटली जींचे योगदान कळावे, याकरिता त्यांचे स्मरण करणे आवश्यक असल्याचे, यावेळी मंत्री लोढा म्हणाले. "मला वैयक्तिक पातळीवर स्व. अरुण जेटली यांचे मार्गदर्शन मिळत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात मी पाऊले उचलली" असे मंत्री लोढा यावेळी म्हणाले. अरुण जेटली हे मोदी सरकारच्या पहिल्या कार्य काळात केंद्रात अर्थमंत्री होते. याकाळात देशात जीएसटी लागू करण्यासह विविध आर्थिक धोरणे राबविण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. पेशाने वकील असलेल्या अरुण जेटली यांच्या कार्याचा सन्मान म्हणून २०२१ साली केंद्र सरकारकडून त्यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी अरुण जेटली यांच्या नातेवाईक निधी शर्मा, श्रवण शर्मा, डालमिया कॉलेजचे प्रमुख विनोद डालमिया, श्रीमती श्रीमा मूर्ति, गगन मुद्रा, सारिखा मुद्रा यांच्यासह डोगरा समाजाचे इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :अरूण जेटलीमंगलप्रभात लोढा