Join us

लता मंगेशकरांचा स्मृतीदिन आणि मदन मोहन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘लतांजली’

By संजय घावरे | Updated: February 2, 2024 22:07 IST

दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रंगणार गाण्यांची सुरेल मैफल

मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा द्वितीय स्मृतीदिन आणि ख्यातनाम संगीत दिग्दर्शक दिवंगत मदन मोहन यांच्या १००व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधत ‘लतांजली’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ताला-सूरांची सुरेख मैफल रंगणार आहे. 

विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये ६ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सहकार्याने मेराक इव्हेंट्सतर्फे लतांजली हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजाने अजरामर झालेली आणि मदन मोहन यांच्या संगीत दिग्दर्शनाने सजलेली गाणी या कार्यक्रमात सादर होणार आहेत. ‘हमारे बाद अब महफिल में अफसाने बयां होंगे...’, ‘नैनो में बदरा छाए बिजली सी चमके हाए...’,’वोह भुली दास्तां, लो फिर याद आ गई...’, ‘आपकी नजरों ने समझा प्यार के काबील मुझे...’, ‘दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन...’, अशी एकापेक्षा एक बहारदर गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत.

सुगंधा दाते, अभिलाषा चेल्लम, संपदा गोस्वामी, राधिका नांदे हे आघाडीचे गायक यात सहभागी होणार आहेत. चिराग पांचाळ यांचे संगीत संयोजन आणि संदीप पंचवाटकर यांच्या निवेदनाने हि मैफिल फुलणार आहे. मागच्या वर्षी लता मंगेशकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.