Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए. आर. रेहमान, अशोक सराफ, रुपकुमार राठोड, पद्मिनी कोल्हापूर यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

By संजय घावरे | Updated: April 16, 2024 20:11 IST

मुंबई : मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांना दिल्या ...

मुंबई : मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांना दिल्या जाणाऱ्या मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

मंगेशकर कुटुंबियांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायक रुपकुमार राठोड, हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर, हरिश भिमानी, रवी जोशी आदी मंडळी उपस्थित होती. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार असल्याचे हृदयनाथ मंगेशकर यांनी घोषित केले. अलिकडेच नागपूरमध्ये संपन्न झालेल्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय म्युझिक पुरस्कार सोहळ्यात रूपकुमार राठोड यांचा 'सूर ज्योत्स्ना आयकॉन इन म्यूझिक अवार्ड' देऊन गौरव करण्यात आला होता. राठोड यांना आता प्रदीर्घ संगीत सेवेसाठी मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही घोषित झाला आहे.

याखेरीज दीर्घकाळ संगीत सेवेसाठी संगीतकार ए. आर. रहमान, नाट्य-सिनेसृटीतील प्रदीर्घ सेवेसाठी अशोक सराफ, सिनेसृष्टीतील प्रदीर्घ सेवेसाठी पाद्मिनी कोल्हापुरे, प्रदीर्घ पत्रकारितेसाठी भाऊ तोरसेकर, प्रदीर्घ नाटय सेवेसाठी अतुल परचुरे, उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी विशेष पुरस्कार रणदीप हुड्डा यांना मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहेत. २०२३-२४ वर्षातील उत्कृष्ट नाटक निर्मितीसाठी दिला जाणारा मोहन वाघ पुरस्कार 'गालिब' या मराठी नाटकाला, तर समाजसेवेसाठी दीपस्तंभ फाउंडेशन मोनोबल या संस्थेला आशा भोसले यांच्यातर्फे आनंदमयी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मंजिरी फडके यांना प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी वाग्विलासीनी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते प्रदान केले जातील. 

मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ वा पुण्यतिथी सोहळा २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता विले पार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात संपन्न होणार आहे. यावेळी 'श्रीशारदा विश्वमोहिनी लतादीदी' या संगीतमय कार्यक्रमाद्वारे भारतरत्न लता मंगेशकर यांना हृदयनाथ मंगेशकर सांगितीक मानवंदना सादर करतील. गायिका विभावरी आपटे जोशी यांची एकल संगीत मैफल होईल. विवेक परांजपे, केदार परांजपे, विशाल गंडूतवार, डॉ. राजेंद्र दुरकर, प्रसाद गोंदकर व अजय अत्रे त्यांना साथ देतील. हा संगीत कार्यक्रम हृदयेश आर्टस्तर्फे आयोजित करण्यात येणार आहे.