Join us

‘गुगल’च्या गुगलीने मुंबईकर हैराण, बॅंकखाते होताहेत झटपट रिकामे

By मनीषा म्हात्रे | Updated: March 13, 2025 07:00 IST

वर्षभरात बनावट संकेतस्थळांच्या गुन्ह्यांनी ओलांडली शंभरी, काळजी घेण्याचे आवाहन

मनीषा म्हात्रे

मुंबई : वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) नोंदणीसाठी सहा बनावट लिंक तयार करून वाहन मालकांची फसवणूक सुरू असल्याचे समोर येताच खळबळ उडाली. दुसरीकडे, आजही बनावट संकेतस्थळाद्वारे फसवणूक सुरू आहे. गेल्या वर्षभरात बनावट संकेतस्थळप्रकरणी ११५ गुन्हे मुंबई पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाले आहेत. कुठल्याही माहितीच्या शोधासाठी आपसूकच गुगलच्या सर्च इंजिनवर आपण पोहोचतो. मात्र, गेल्या काही दिवसांत याच सर्च इंजिनमुळे अनेकांचे खिसे रिकामे होण्याच्या घटना वाढत आहेत. 

अचूक माहिती मिळावी, या उद्देशाने खासगी, शासकीय आस्थापनांचे उपलब्ध तपशील बदलण्याचे अधिकार ‘गुगल’ या देशातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वापरकर्त्यांना दिले. याचाच फायदा ऑनलाईन ठगांनी घेतल्यामुळे मुंबई, दिल्लीसह देशभरात फसवणुकीच्या प्रकारांनी डोके वर काढले आहे. जवळची बँक शाखा, मोबाईल किंवा वीजबिल भरणा केंद्र, विविध सेवा पुरवठादार कंपन्यांचे सर्व्हिस सेंटर, ग्राहक तक्रार केंद्र, हॉटेल या आणि अशा प्रत्येक शासकीय, खासगी आस्थापनांचा पत्ता, संपर्क क्रमांक, अचूक दिशा दर्शविणाऱ्या नकाशासाठी गुगलचा उपयोग होतो. हे तपशील अचूक असावेत यासाठी गुगलने सजेस्ट ॲण्ड एडीट हा पर्याय दिला. त्याद्वारे तपशील बदलता येतो. याचाच फायदा घेत ठगांकडून फसवणूक करण्यात येत आहे. 

गेल्या काही महिन्यांत या घटनांचे प्रमाण वाढत आहे. बनावट संकेतस्थळामुळे गेल्या वर्षभरात ११५ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी २३ गुन्ह्यांची उकल करत २६ जणांना अटक केली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात ४ गुन्हे नोंद झाले आहेत. गुगलच्या अशा गुगलीमुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

खात्यातून परस्पर पैसे काढले

आस्थापनांचा अधिकृत संपर्क क्रमांक खोडून स्वत:चा मोबाईल क्रमांक गुगलवर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे समोरून बोलणारी व्यक्ती बँक, ग्राहक सेवा केंद्रातील अधिकारी असे भासवून वापरकर्त्यांशी संवाद साधला जातो. पुढे बँकेने कार्ड ब्लॉक झाल्याची भीती घालून बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्डच्या तपशीलाची मागणी केली जाते. खातेदारांकडून माहिती मिळताच त्याआधारे ऑनलाईन ठग संबंधितांच्या खात्यातून परस्पर पैसे काढत आहेत.

...अशी होते सायबर लूट

सायबर भामटे हे नामांकित वित्तीय संस्था व बँकांच्या नावाने बनावट वेबसाइट बनवून त्यावर कर्ज वाटपाबाबत नमूद करण्यात येते. ऑनलाईन कर्ज घेण्यासाठी गुगलवर सर्चिंग करणारी मंडळी अशा वेबसाईटला बळी पडतात. अशा संकेतस्थळावरील संबंधित लिंकवर वैयक्तिक माहिती शेअर करताच, ठग मंडळीकड़ून कॉल येतो. कर्ज मंजूर होण्यासाठी प्रोसेसिंग फि भरण्यास सांगतात.  फि भरताच, लवकरच पैसे खात्यात जमा होणार असल्याचे सांगून कॉल कट होतो. त्यानंतर ठग मंडळीही नॉट रिचेबल होत आहेत.

कोणती काळजी घ्यावी?

बँक खात्यासह डेबीट-क्रेडीट कार्डाचे तपशील कोणालाही देऊ नका. ऑनलाईन व्यवहारांसाठी ओटीपीची विचारणा होते. 

ओटीपीशिवाय व्यवहार पूर्ण होत नाहीत. त्यामुळे मोबाईलवर ओटीपी क्रमांक दर्शवणारा लघुसंदेश आल्यास त्यातील तपशील कोणालाही देऊ नयेत. गुगलद्वारे माहिती मिळवताना संबंधीत आस्थापनेच्या अधिकृत संकेतस्थळाचा शोध घ्यावा. त्यावरून संपर्क क्रमांक किंवा अन्य तपशील घ्यावेत, असे आवाहन सायबर पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबईसायबर क्राइममुंबई पोलीस