Join us

रक्ताचा अखेरचा थेंब असेतो वाढवण बंदराला विरोध

By admin | Updated: June 26, 2015 22:59 IST

नियोजित वाढवण बंदराला अंगात रक्ताचा अखेरचा थेंब असे पर्यंत प्राणपणाने विरोध करू. परिसराची राखरांगोळी करून सर्वांना उध्वस्त करणारे वाढवण बंदर

डहाणू : नियोजित वाढवण बंदराला अंगात रक्ताचा अखेरचा थेंब असे पर्यंत प्राणपणाने विरोध करू. परिसराची राखरांगोळी करून सर्वांना उध्वस्त करणारे वाढवण बंदर कदापी होऊ देणार नाही असा निर्धार वरोर ग्रामस्थांनी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या पटांगणात ग्रामपंचायतीने बंदर विरोधासाठी भरविलेल्या खास सभेत केला.वरोर ग्रामपंचायत आणि वाढवण ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रात केंद्रसरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत जवाहरलाल नेहरू पोर्टट्रस्ट उभारीत असलेल्या बंदराला कडाडून विरोध करण्यासाठी ग्रामसभा भरली होती. या सभेत आ. कपिल पाटील, नारायण विंदे, मंगेश चौधरी, सरपंच शंकर बीज, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नारायण पाटील, विनित पाटील, सागर चौधरी, चित्रलेखा पाटील, राहुल नाईक, गणेश दवणे, कृपानाथ पाटील, धर्मा नाईक, प्रीती सुतारी, यांनी उपस्थित राहून सर्वांनी वाढवण बंदर विरोधी भूमिका मांडल्या. नियोजित वाढवण बंदर प्रत्यक्षात ज्या ठिकाणी होणार आहे तो समुद्र माशांचे आगर असून त्यांची प्रजोत्पती येथे होते. या ठिकाणी रस्ते आणि रेल्वेसाठी एक गुंठाही सरकारी जमिन नसल्याने सर्व जमिन संपादीत करावी लागणार आहे. या परिसरातील तारापूर अणुशक्ती केंद्र, सूर्याप्रकल्प, दापचरी प्रकल्पासाठी संपादीत केल्या मात्र त्यांचे पुर्नवसन झालेच नाही आणि ते पूर्णपणे उध्वस्त झाले. येथे तारापूर अणुशक्तीकेंद्र, रिलायन्स एनर्जीचे प्रकल्प आणि जवळच पाकीस्तानची हद्द असल्याने संरक्षणाच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. धाकटी डहाणू, सातपाटी, डहाणू, मुरबे, नवापूर येथील मच्छीमारीही याच पट्ट्यातून होत असून त्यावर हजारो कुटुंबे अवलंबून आहेत.अठरा वर्षापूर्वी याच ठिकाणी होऊ घातलेले वाढवण बंदर संघर्ष समितीने तीन वर्षे लढा देवून न्यायालयाच्या व डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून ते रद्द केले होते. (वार्ताहर)