Join us  

मालमत्ता कर थकबाकीदारांना शेवटची डेडलाइन; उद्दिष्टासाठी महापालिकेचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 9:57 AM

१५ दिवसांत २०३ कोटींचा कर जमा.

मुंबई : आर्थिक वर्ष संपल्यानंतर १ ते १५ एप्रिलपर्यंत पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडे २०३ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. येत्या २५ मेपर्यंत २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर न भरल्यास कठोर दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता करवसुलीसाठी मागील काही दिवसांपासून कंबर कसली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी साडेचार हजार कोटी रुपये करवसुलीचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. 

चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत पालिकेला अंमलात कराचे लक्ष्य गाठता आपले नाही. मात्र, यंदा पालिकेकडून फेब्रुवारीत देयके पाठवल्याने  मालमत्ताधारकांना कर भरणा करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी देणे आवश्यक आहे. त्यानुसार मुंबईकरांना येत्या २५ मेपर्यंत कर भरण्याची शेवटची मुदत असणार आहे.

मुंबईकरांच्या मदतीने प्रशासन साडेचार हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता कराचे लक्ष्य गाठेल, असा विश्वास पालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत.दरम्यान, २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुंबई महानगरपालिकेकडून ३१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रुपये इतका कर जमा करण्यात आला  आहे. 

मेट्रो कंत्राटदारांनाही बजावल्या नोटिस-

मालमत्ता कराचे लक्ष्य गाठण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांमधील थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. मागील थकबाकी वसुलीसाठी देखील प्राधान्य देण्यात येत आहे.  यंदा वेळोवेळी टॉप टेन थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. यामुळे मालमत्ता कराच्या थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय कास्टिंग यार्डच्या थकलेल्या करासाठी पालिकेने मेट्रो कंत्राटदारांनाही नोटिसा पाठविल्या आहेत.

पालिकेने मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही वॉर्डनिहाय कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवल्याने त्याचाही उपयोग मालमत्ताधारकांना होत आहे.

दिवसभरातील टॉप टेन थकबाकीदार-

सिद्दिक एम. आफिजी - २ कोटी २७ लाख ९४ हजार ०७१ 

कमला मिल्स लिमिटेड - २ कोटी २४ लाख ०५ हजार ७०८ 

ओम ओमेगा शेल्टर्स - २ कोटी २३ लाख ११ हजार ९७० 

श्री समर्थ स्पार्क डेव्हलपर्स - २ कोटी १४ लाख ०६ हजार ७८६ 

ट्रान्सकॉन शेठ क्रिएटर्स प्रा.लि. - २ कोटी १२ लाख ९५ हजार ८१८ 

रिलायन्स कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड - २ कोटी १० लाख ८७ हजार १७९ 

गणपत गणरू काटकर - २ कोटी ०९ लाख १४ हजार ६४७ 

पंचशील गृहनिर्माण संस्था - २ कोटी ०७ लाख ४७ हजार ४४४ 

लेझर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लिमिटेड - २ कोटी ०४ लाख १५ हजार ९५६ 

लोखंडवाला बिल्डर्स - २ कोटी ४४ हजार ३६०

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकर