Join us

शेवटच्या दिवशी उमेदवारांचा रॅलींवर भर

By admin | Updated: April 20, 2015 22:40 IST

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांच्या निवडणुका २२ एप्रिल रोजी असून सोमवारी रात्री १० वाजता प्रचाराची मुदत संपली.

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांच्या निवडणुका २२ एप्रिल रोजी असून सोमवारी रात्री १० वाजता प्रचाराची मुदत संपली. शेवटच्या प्रचारात सर्व उमेदवारांनी प्रभागात रॅली काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. शिवसेनेने सोमवारी अंबरनाथ आणि बदलापुरात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची रॅली काढून प्रचाराची सांगता केली.मतदारयाद्यांचा घोळ, आरक्षित प्रभागांचा घोळ, जातपडताळणी प्रमाणपत्रांचा घोळ, राज्य शासनाच्या निर्णयाचा घोळ आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा घोळ या सर्वांतून मार्ग काढत निवडणुकीच्या प्रचाराचा शेवट अखेर सोमवारी रात्री झाला. अंबरनाथ आणि बदलापूरची निवडणूक ही अनेक कारणांनी चर्चेत राहिली. त्यातच सर्वच पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवित असल्याने प्रत्येक पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली, अशी चर्चा असताना प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सायंकाळी ७ वाजता आदित्य ठाकरे यांची रॅली आयोजित करण्यात आली. पूर्व आणि पश्चिम भागांत रॅली झाल्यावर सेनेने आपल्या जाहीर प्रचाराचा शेवट केला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाच्या सर्वच उमेदवारांनी सायंकाळी प्रभागात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. प्रत्येक रस्त्यावर कार्यकर्त्यांचा घोळका उभा होता. रिक्षा आणि चारचाकी गाड्यांतून स्पीकरच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार सुरू होता. अपक्ष उमेदवारांनी प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचाराचा शेवट केला. त्यातच रात्री ८ वाजता पावसाने हजेरी लावल्याने उमेदवारांनी भर पावसातच प्रचार करणे पसंत केले. (प्रतिनिधी)