मुंबई : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तपास अहवाल सादर करण्यासाठी सोमवारी दोन आठवड्यांची अंतिम मुदत दिली. वारंवार निर्देश देऊनही याप्रकरणाचा तपास अहवाल न्यायालयाुढे सादर न करण्यात आल्याने न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) तपास अहवाल सादर करण्यासाठी अखेरची संधी दिली. ‘आॅक्टोबरमध्येच तुम्हाला (एसीबी) यासंदर्भात तपास अहवाल सादर करण्याचा निर्देश दिला होता. तपास अहवाल सादर न करता तुम्ही वेळ मागत आहात. आम्ही तुम्हाला शेवटची संधी देत आहोत. दोन आठवड्यांत अहवाल सादर करा,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवडे तहकूब केली.कृपाशंकर सिंह यांचे लागेबांधे केंद्र सरकारशी असल्याने पोलिसांनी दबावाखाली ढिसाळ तपास केल्याचा आरोप करत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते तुलसीदास नायर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र कृपाशंकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)
अहवाल सादर करण्यास सरकारला अखेरची संधी
By admin | Updated: January 10, 2017 04:55 IST