Join us  

धारावीत उभं राहणार मुंबईतील सर्वात मोठं सुविधा केंद्र; शौचकूप, स्नानगृहासह कपडे धुण्याची असणार सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 7:25 PM

Mumbai News : सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत महापालिकेने विविध ठिकाणी सामुदायिक शौचालयांची व सुविधा केंद्रांची उभारणी केली आहे.

मुंबई - धारावी परिसरात मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र उभारण्याच्या कामाला शनिवारपासून सुरुवात करण्यात आली. यामध्ये १११ शौचकूप, आठ स्नानगृह आणि कपडे धुण्यासाठी दहा मोठ्या आकाराची यंत्रे असणार आहेत. 'सामाजिक उत्तरदायित्व निधी'च्या माध्यमातून बांधण्यात येणार्‍या या केंद्रासाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील सहा महिन्यांत सुविधा केंद्राचे काम पूर्ण होऊन धारावी परिसरातील पाच हजार लोकांना त्याचा लाभ होणार आहे.

सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत महापालिकेने विविध ठिकाणी सामुदायिक शौचालयांची व सुविधा केंद्रांची उभारणी केली आहे. सन २०१६ मध्ये घाटकोपर मधील आझाद नगर परिसरात पहिले सुविधा केंद्र उभारण्यात आले. आता मुंबईतील सहावे सुविधा केंद्र धारावी परिसरात उभारण्यात येत आहे. सुमारे २६०० चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या व तीन मजली असणाऱ्या या भव्य सुविधा केंद्रामध्ये स्त्री, पुरुष, दिव्यांग, लहान मुले यांच्यासाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणार आहेत. हे सुविधा केंद्र गंधमुक्त असेल याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

अंघोळीला मिळणार गरम पाणी

येथे स्नान करण्यास येणाऱ्यांना साबणाची वडी दिली जाणार आहे. तसेच गरम पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सुविधा केंद्रावर सोलर पॅनल बसविले जाणार आहेत. पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर करण्यासोबतच या केंद्रात पाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी प्रक्रिया केंद्र सुरू केले जाणार आहे.

प्रति लीटर पाण्यासाठी एक रुपया

येथे प्रति लीटर पाण्यासाठी एक रुपया शुल्क आकारले जाणार आहे. स्थानिक नागरिकांना दीडशे रुपयांत कौटुंबिक मासिक पास दिला जाणार आहे. यामध्ये कुटुंबातील पाच व्यक्तींना सुविधा  मिळणार आहे. तर लहान मुलांना मोफत प्रवेश असेल. यांत्रिक पद्धतीने कपडे धुण्याची सुविधा देखील या केंद्रात अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहे. 

टॅग्स :मुंबईधारावी