Join us

मोठ्या नाल्यांतील गाळ वाढतोय!

By admin | Updated: May 13, 2015 01:08 IST

शहरातील नैसर्गिक नाल्यांमधील गाळ व अतिक्रमण काढण्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. अनेक नाल्यांचा आकार कमी झाला आहे

नवी मुंबई : शहरातील नैसर्गिक नाल्यांमधील गाळ व अतिक्रमण काढण्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. अनेक नाल्यांचा आकार कमी झाला आहे. गाळ वाढल्यामुळे पावसाचे पाणी शेजारच्या वस्तीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली असून पालिकेच्या उदासीनतेविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईमध्ये एका बाजूला खाडी व दुसऱ्या बाजूला डोंगररांगा आहेत. पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी १८ मोठ्या नाल्यांमधून खाडीत जाते. परंतु २० वर्षांमध्ये महापालिकेने या नाल्यांच्या संरक्षणासाठी काहीही केलेले नाही. यामुळे नाल्यांचा आकार कमी होत आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. नाल्यात डेब्रीज व इतर कचरा पडला आहे. नाल्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. वाशी सेक्टर-१७ च्या मागील बाजूच्या नाल्यातील गाळही वाढला आहे. सानपाडा ते जुईनगर रेल्वे स्टेशनदरम्यानच्या नाल्यातील गाळ व रोडची पातळी यामध्ये जास्त अंतर राहिलेले नाही. नागरिकांनी मागणी करूनही हा गाळ काढला जात नाही. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये नाल्यातील पाणी जात आहे. महापालिका प्रशासन एकत्रित नाला व्हिजनच्या नावाखाली नाल्यांमधील गाळ व पात्र रुंदीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. पावसाळापूर्व नालेसफाई सुरू झाली आहे. या नाल्यांमधील अडथळे दूर केले जात आहेत. किरकोळ कचराही काढला जात आहे. परंतु यामुळे प्रश्न मिटणारा नसून पूर्ण गाळ काढणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पात्र अरुंद आहे तेथे ते रुंद केले नाही तर पावसाळ्यात वसाहतीमध्ये पाणी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.