Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकडे जाणारी लेन अखेर सुरू

By admin | Updated: March 19, 2015 22:26 IST

मुंबईकडे जाणारी कापूरबावडी उड्डाणपुलाची ८०० मीटरची लेन अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खुली होणार आहे.

ठाणे : मुंबईकडे जाणारी कापूरबावडी उड्डाणपुलाची ८०० मीटरची लेन अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खुली होणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी कोंडी फुटणार असून थोडासा वळसा घालून का होईना परंतु वाहतूककोंडीमुक्त प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. तसेच माजिवडा येथे होणारी वाहतूककोंडीही सुटणार आहे. कापूरबावडी येथील चार लेनपैकी केवळ मुंबईकडे जाणारी ही लेन फार काळ रखडली होती. तिचे काम पूर्ण झाल्यानंतर केवळ मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, म्हणून याचा शुभारंभ रखडला होता. परंतु, त्याच कालावधीत या पुलाला तडे गेल्याचा मुद्दा पुढे आल्याने त्याचा शुभारंभ तीन ते चार महिने लांबणीवर पडला. तडे गेल्याचा मुद्दा फारच गाजून यासंदर्भात चौकशी देखील लागली. परंतु, आता अडथळ्यांची शर्यत पार करून येत्या २१ तारखेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही लेन खुली होणार आहे. ही लेन खुली झाल्याने कोपरी उड्डाणपुलावर मात्र ताण अधिकच वाढणार आहे. या पुलाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव २००३ मध्ये मंजूर झाला होता. परंतु, त्यावर अद्यापही काही तोडगा निघालेला नाही. दोन वर्षांपासून आमदार संजय केळकर यांनी पुलाच्या कामाबाबत लढा सुरू केल्याने त्यांना यश आले असून या पुलाच्या कामाचा नारळ लवकरच फुटेल, अशी आशा व्यक्त केली.