अनिकेत घमंडी, डोंबिवली शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी दिवा हे सोयीचे जंक्शन असूनही ‘होळी स्पेशल’ गाडीला थांबा न देण्याची परंपरा मध्य रेल्वेने यंदाही कायम राखली. होळी स्पेशल गाडीला थांबा देण्यात येईल, असे आश्वासन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांना दिले होते. तसे त्यांनी प्रवाशांनाही सूचित केले होते, मात्र त्याची पूर्तता न झाल्याने हजारो प्रवाशांनी ‘खासदार-आमदारां’च्या नावे शिमगा केला आहे. कहर म्हणजे सीएसटी-करमाळी ही गाडी ५ आणि ७ मार्च रोजी सीएसटीतून सुटली, त्या गाडीला दिव्यात १ मिनिटाचा थांबा दिल्याचे इंटरनेटवर दर्शविले होते. परंतु प्रत्यक्षात रेल्वे वेळापत्रकात हा थांबाच नव्हता, त्यामुळे शेकडो प्रवाशांची ऐनवेळी पंचाईत झाली.कोकणात गणेशोत्सवाप्रमाणेच शिमगाही उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. यंदा तर गुरुवारी होळी, शुक्रवारी धुळवड आणि नंतर शनिवार व रविवार अशी सलग सुट्टी आल्याने अनेकांनी या लाँग वीकेण्डला कोकणात जाण्याचे बेत आखले होते. पण, कोकण रेल्वेने दिलेले आश्वासन न पाळून प्रवाशांना अडचणीत आणले.
दिव्याचा थांबा इंटरनेटवरच!
By admin | Updated: March 9, 2015 01:17 IST