Join us

लसींच्या सुरक्षेबाबत ‘द ललित’चा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:06 IST

महापौर : हॉटेल व्यवस्थापकांना विचारला जाबमुंबई : ‘द ललित’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये लस ठेवण्यासाठी असलेल्या शीतपेट्यांचे व्यवस्थित परिरक्षण ...

महापौर : हॉटेल व्यवस्थापकांना विचारला जाब

मुंबई : ‘द ललित’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये लस ठेवण्यासाठी असलेल्या शीतपेट्यांचे व्यवस्थित परिरक्षण होत नसल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निदर्शनास आले. या हॉटेलमधील लसीकरण केंद्राची त्यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी हॉटेलच्या व्यवस्थापकांना जाब विचारून लस सुरक्षिततेबाबत हॉटेल प्रशासन गंभीर नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

‘द ललित’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये लस ठेवण्यासाठी शीतपेट्या आहेत, मात्र या शीतपेट्यांचे व्यवस्थित परिरक्षण होत नसून हाॅटेलकडून यासंदर्भात निष्काळजीपणा हाेत असल्याचे महापाैरांच्या पाहणीत निदर्शनास आले. मुंबईतील काही हॉटेल त्यांच्या पॅकेजमधून कोविड लस देत आहेत, हे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने अशा हॉटेलांवर कारवाईचे आदेश राज्यांना दिले आहेत. ‘द ललित’ या हॉटेलातही पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर महापौर पेडणेकर यांनी चौकशी करण्यासाठी थेट ‘द ललित’ हॉटेलला भेट दिली.

पाहणीत हॉटेलमध्ये कोल्ड चेन मेन्टेन केली जात नसल्याचे समाेर आले. घरगुती वापराच्या फ्रीजमध्ये कोविड लसींचा साठा करण्यात आला होता. आइस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात होता. त्यामुळं येथे झालेल्या लसीकरणाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे. महापौरांनी या प्रकाराबाबत हॉटेल व्यवस्थापकांना जाब विचारला. या हाॅटेलमधील लस साठवणीच्या पद्धतीबाबत साशंकता आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

..............................................................................................