Join us

रिक्षांसाठी ‘लेडीज स्पेशल’

By admin | Updated: December 18, 2014 23:59 IST

कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर महिलांसाठी विशेष रिक्षा रांग सुरू करण्यात आली आहे.

कल्याण - कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर महिलांसाठी विशेष रिक्षा रांग सुरू करण्यात आली आहे. या लेडीज स्पेशल रिक्षांचा शुभारंभ गुरूवारी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही़ व्ही़ लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते झाला. या सोयीमुळे महिला प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. ठाणे रिजन रिक्षाचालक मालक असोसिएशनच्या पुढाकाराने ही स्पेशल रांग सुरू करण्यात आली आहे. दिवसागणिक नागरीकरण झपाट्याने वाढत असून शहरातील ५० टक्के महिला या कामानिमित्त डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, मुंबई येथे जातात. दरम्यान, संध्याकाळी परतल्यावर रिक्षासाठी तासन तास ताटकळत राहावे लागते. त्यात सायंकाळी रिक्षांचा तुटवडा असल्याने त्यांच्या त्रासात अधिकच भर पडताना दिसते. बऱ्याच वेळेला रिक्षातील सहप्रवासी असलेल्या पुरूषांच्या अश्लील वर्तणुकीला सामोरे जावे लागत होते. यावर वाहतूक शाखेच्या ठाणे पोलीस उपायुक्त डॉ़ रश्मी करंदीकर यांनी महिलांसाठी स्वतंत्र रांग असावी अशी सूचना रिक्षाचालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांना केली होती. (प्रतिनिधी)