नागोठणे : शहरासह विभागात गुरुवारी रात्रीपासून पावसाने रौद्र रूप धारण केल्याने जनजीवन काही अंशी विस्कळीत झाले आहे. अंबा नदी दुथडी भरून वाहत असून नदीतील पाणी मात्र काळसर रंगाचे झाले आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रोहे तहसीलला याबाबत कळवल्यास, त्यांचेकडून नदीची पाहणी करण्यात आली. अंबा नदी किनाऱ्यालगत अनेक कारखाने आहेत. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून पडणारे तसेच नाले आणि शेतातील पाणी या नदीतच येते. असल्यामुळे नदीचे पाणी कशामुळे काळे झाले आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पावसाचा जोर काही अंशी कमी झाला असला तरी सायंकाळनंतर तो पुन्हा वाढला, तर नागोठणे शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई,ठाणे बाजूकडून येणाऱ्या एसटी बसेस उशिराने बसस्थानकात येत असल्याचे वाहतूक नियंत्रक भोईर यांनी सांगितले. सुकेळी खिंडीतील वाहतूक सुरळीत चालू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. पावसामुळे अंबा नदीवरील के. टी. बंधाऱ्यात पाण्याचा साठा पुरेसा झाला असल्याने काही अंशी भेडसावणारी पाणीटंचाई त्यानिमित्ताने दूर झाली आहे.
नागोठणेत जनजीवन विस्कळीत
By admin | Updated: June 19, 2015 21:58 IST