Join us

फडके नाट्यगृहात सुविधांचा अभाव

By admin | Updated: January 1, 2015 01:51 IST

पनवेल नगरपरिषदेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत अशा वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची निर्मिती केली.

नवी मुंबई : पनवेल नगरपरिषदेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत अशा वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची निर्मिती केली. मागील सात ते आठ महिन्यांपासून या नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग देखील सुरु झाले मात्र वर्षभराच्या आतच याठिकाणी सुविधांचा अभाव असल्याचे चित्र दिसत आहे . रविवारी याठिकाणी एका नाटकाचे प्रयोग सुरु होते. तीन प्रयोग असलेल्या या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला तर नाट्यगृहात पाणीपुरवठा वेळेवर सुरु होता मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयोगाला मोटार बंद पडल्याने पाणी पुरवठा खंडित झाला. यावेळी रंगकर्मींची देखील पुरतीच गैरसोय झाली. अद्ययावत नाट्यगृहात बंद पडलेल्या मोटारसाठी त्वरित पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते मात्र याठिकाणी तशाप्रकारची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. दुसऱ्या दिवशी बंद पडलेली मोटार सुरु करण्यात आली. नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या नाट्यगृहाच्या देखरेखीसाठी खाजगी कंपनीची देखील नियुक्ती करण्यात आली आहे . मात्र तरी देखील नाट्यगृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे . याठिकाणी बसविण्यात आलेल्या दरवाजांचे कुलूप देखील मोडकळीस आले आहेत . स्वच्छतागृहात देखील तंबाखू, गुटखा खावून त्याचे पॅकेट स्वच्छतागृहात टाकले असल्याचे दिसून येत आहे . याच ठिकाणी बसविण्यात आलेले अद्ययावत सेंंन्सर मशीन देखील बंद पडलेले दिसून येत आहे . करोडो रुपये खर्चून उभारलेल्या या नाट्यगृहाची झालेली दुरवस्था पाहून रसिक प्रेक्षकांनी देखील याठिकाणच्या दुरवस्थेसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . पनवेल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले . असे असेल तर मी स्वत: नाट्यगृहात जावून त्याठिकाणची पाहणी करेन, जर का यामध्ये काही तथ्य आढळले तर याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)