Join us

विद्यार्थ्यांना बनवले मजूर

By admin | Updated: June 29, 2015 05:13 IST

शाळेचे होर्डिंग्ज लावण्यासाठी कामगार वापरण्याऐवजी विद्यार्थ्यांचा वापर केला गेल्याचा प्रकार कोपरखैरणे येथे घडला.

नवी मुंबई : शाळेचे होर्डिंग्ज लावण्यासाठी कामगार वापरण्याऐवजी विद्यार्थ्यांचा वापर केला गेल्याचा प्रकार कोपरखैरणे येथे घडला. एका शाळेचे शिक्षकच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हे जाहिरातबाजीचे काम करताना आढळले. शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांकडून मजुरासारखी कामे करून घेतली जात असल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.शनिवारी कोपरखैरणे परिसरातील पालकांच्या निदर्शनास ही बाब आली. तिथल्या विश्वभारती शाळेतील काही मुले शाळेच्या जाहिरातीचे होर्डिंग्ज लावत परिसरात फिरत होती. विशेष म्हणजे ही सर्व मुले शाळेच्या गणवेशातच होती आणि त्यांच्यासोबत शाळेचे शिक्षकदेखील सूचना देत फिरत होते. सेक्टर १५ ते १८ परिसरांतील उद्यानाभोवती होर्डिंग्ज लावण्याचे काम विद्यार्थ्यांकडून करून घेतले जात होते. शाळेच्या मुलांऐवजी एखाद्या कामगाराद्वारे देखील हे होर्डिंग लावले जाऊ शकत होते. मात्र कामगारांवर होणारा खर्च वाचवण्यासाठी शाळेने विद्यार्थ्यांनाच हमालासारखे वापरून घेतल्याचे दिसून येत होते. उंचावर होर्डिंग लावण्यासाठी शिडी व काही होर्डिंग हातात घेऊन हे विद्यार्थी परिसरात फिरत होते. ही सर्व मुले त्याच परिसरात राहणारी असल्याने काहींच्या पालकांनी हा प्रकार पाहून नाराजी व्यक्त केली. होर्डिंग लावण्यासाठी मदत करणारे आजी-माजी विद्यार्थी होते, हे शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गायकवाड यांनी मान्य केले. शाळेतून घरी जाणाऱ्या काही मुलांनी होर्डिंगचे साहित्य पोहचविण्यासाठी मदत केली, असे ते म्हणाले. शहरातील इतरही काही शाळा, कोचिंग क्लासेसच्या होर्डिंगबाजीसाठी विद्यार्थ्यांचा वापर होत असतो. शिक्षकांनी सांगितलेल्या कामाला नकार देणे विद्यार्थ्याला सहज शक्य नसल्याने त्यांना हे काम करणे भाग पडते. परंतु अशा प्रकारांना कायमचा आळा बसण्याची अपेक्षा पालकवर्गाकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)