Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेअभावी बांधकामाधीन इमारतीवरून कोसळून मजुराचा मृत्यू

By मनीषा म्हात्रे | Updated: June 5, 2024 22:20 IST

विकासकासह टेक्नॉलॉजी कंपनीविरुद्ध गुन्हा

मुंबई : भांडुपमध्ये बांधकामाधीन इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना सुरक्षेअभावी इमारतीवरुन पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. नदीम नईम खान असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सृष्टी डेव्हलपर्स आणि अन्य संबंधित आरोपींविरोधात नुकताच भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

भांडुप पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिल घायवट यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा येथील रहिवासी नदीम नईम खान (१९) हा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला असल्याची माहिती २० फेब्रुवारीला मुलुंड अग्रवाल रुग्णालयातून मिळाली. त्यानुसार, अपमृत्युची नोंद करुन भांडुप पोलिसांनी तपास सुरू केला.

नदीम हा मार्श टॅक्नोलॉजी या कंपनीकडून भांडुप पश्चिमेकडील गावदेवी रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मार्शल सृश्टी २ या इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम करत होता. मात्र, इमारत उभारत असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ्टीबेल्ट, हेल्मेट, दोरखंड, हातमोजे असे काहीच दिले नव्हते. तसेच, बांधकामा दरम्यान खाली पडणारा कच्चा माल, कचरा यांना अडवण्यासाठी संरक्षक जाळीसुद्धा बांधण्यात आली नव्हती.

मार्शल सृष्टी २ इमारतीचे बांधकाम करत असलेला बांधकाम व्यावसायिक सृष्टी डेव्हलपर्स, सीसीटीव्ही बसविणारी मार्श टॅक्नोलॉजी कंपनी आणि अन्य संबंधितांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही काळजी, खबरदारी, उपाययोजना न केल्याने नदीमचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यानुसार, याप्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

अधिक तपास सुरुयाप्रकरणी संबंधित विकासक आणि टेक्नॉलॉजी कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील कारवाई करण्यात येईल असे भांडुप पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिली आहे.