Join us  

कामगार नेते विजय कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:14 PM

Vijay Kamble : कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आणि कारखाना टिकला पाहिजे आणि कामगार जगला पाहिजे, अशी त्यांची नेहमी भूमिका होती.

मुंबई : श्रमिक उत्कर्ष सभेचे सरचिटणीस व झुंजार कामगार नेते विजय कांबळे (८१) यांचे आज सायंकाळी साडेसहा वाजता लीलावती हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना गेल्या आठवड्यात उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी वर्षा, मुलगा जितेंद्र, सून, नात, भावंडे असा परिवार आहे.

उद्या सकाळी १० ते १२ दरम्यान त्यांचे पार्थिव दर्शनासाठी वांद्रे पूर्व, खेरनगर येथील युनियन कार्यालयात ठेवण्यात येणार असून दुपारी दादर, चैत्यभूमी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आणि कारखाना टिकला पाहिजे आणि कामगार जगला पाहिजे, अशी त्यांची नेहमी भूमिका होती. कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला होता. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे म्हणून त्यांनी सातत्याने लढा दिला होता. तसेच, स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

१९९८ साली अरबी समुद्रात मूठभर माती टाकून त्यांनी यासाठी आंदोलन सुरू केले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. कुर्ला विधानसभा मतदार संघातून त्यांना भाजपाने तिकीट दिले, मात्र त्यांचा पराभव झाला.

टॅग्स :मुंबई