Join us
Daily Top 2Weekly Top 5

कासातील शुभमने कॅटलिना खाडी केली पार

By admin | Updated: August 29, 2015 22:10 IST

डहाणू तालुक्यातील कासा येथील शुभम वनमाळी याने २५ आॅगस्ट रोजी अमेरीकेतील लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया) येथील कॅटलिना खाडी १० तास ४२ मिनिटात पार करून विक्रम केला आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील कासा येथील शुभम वनमाळी याने २५ आॅगस्ट रोजी अमेरीकेतील लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया) येथील कॅटलिना खाडी १० तास ४२ मिनिटात पार करून विक्रम केला आहे.शुभम याने कॅटलिना खाडी भारतीय स्थानिक वेळेनुसार रात्री १०.४० वा पोहायला सुरूवात केली. अतिशय थंड पाणी, जलचरांचा त्रास, जोरदार वारे तसेच सतत बदलणारा प्रवाह यांच्याशी सामना करून त्याने ३५ किलोमिटरची ही खाडी सकाळी ९.२० मिनिटांनी पार केली. या विक्रमाची नोंद केल्यावर त्याने भारताचा तिरंगा फडकविला. त्याने गेल्या दहा वर्षापासून जलतरणामध्ये विविध स्तरावर सहभागी होऊन यश मिळविले आहे. शुभमने ४ आॅगस्ट २०१४ रोजी ३१ कि.मी. लांबीची जगभरात ख्यातनाम असलेली इंग्लंड (डोवर) ते फ्रान्सला जोडणारी इंग्लिश खाडी १२ तास ४२ मिनिटात पोहून २०१४ मध्ये पुरूष गटातील जगातील सर्वात तरूण जलतरणपटू होण्याचा मान मिळविला आहे. तसेच स्पेन ते आफ्रिका यास जोडणारी १७.६ कि.मी. अंतराची जगातील सर्वात खडतर म्हणून प्रसिद्ध असलेली जिब्राल्टर सामुद्रधुनी ३ तास १६ मिनिटात पोहून विक्रम केला आहे. तसेच यापूर्वी २१ जानेवारी २०१४ रोजी धरमतर ते गेटवे आॅफ इंडिया हे सागरी अंतर पार केले आहे. २० वर्षीय शुभम वनमाळी हा मूळ कासा येथील रहिवासी असून तो सध्या नेरूळ नवी मुंबई येथे राहत आहे. तो स्टार्लिन कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंटच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याला जागतिक पातळीवरील जलतरणपटूंसाठी २७ वे मानांकन मिळाले असून यापुढे अमेरीकेतील मॅनहटन बेटावरील ५० कि. मी. लांबी असलेली नदी पार करण्याचे ध्येय आहे.वडील धनंजय व प्रशिक्षक गोकुळ कामथ यांचे मार्गदर्शन त्याला लाभले. (वार्ताहर)