Join us

गर्दुल्ल्यांचा डेपो! काही झाले तर त्याला जबाबदार कोण?

By सचिन लुंगसे | Updated: March 3, 2025 12:25 IST

कुर्ला नेहरुनगर एसटी आगारामध्ये बारा महिने अंधार!

सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कुर्ला पूर्वेकडील नेहरुनगर एसटी आगाराचा परिसर दहा ते बारा एकरवर वसला असून एका बाजूला रांगेत उभ्या राहणाऱ्या बसचा परिसर सोडला तर मंदिरापासून पुढील सगळा परिसर वर्षाच्या बारा महिने अंधारात असतो. येथे डम्प करण्यात आलेली वाहने आणि रात्री मुक्कामी असलेल्या गाड्या उभ्या केल्या जातात. हा परिसर कायम अंधारात असतो. त्यातच परिसरात रात्रीच्या वेळी गर्दुल्ले मोठ्या प्रमाणावर वावरत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या ठिकाणी गैरकृत्य होण्याची भीती प्रवाशांनी कित्येक वेळा वर्तवली; मात्र याबाबत कोणतीच खबरदारी घेतली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. या एसटी स्टैंडमधून एसटीच्या शेकडो फेऱ्या कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश या ठिकाणी होतात.

पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर सर्वच एसटी आगार आणि स्टँडमधील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील अनेक आगारांत सध्या सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असून, रात्रीच्या वेळी आगारात गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे.

अनेक ठिकाणी दिव्यांची सोय नसल्याने गाड्या अंधारात थांबविल्या जातात. अनेक आगारांत प्रवाशांना काय, कर्मचाऱ्यांनाही बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही.

इतर सुविधांचीही वानवा असते, ती वेगळीच. 'लोकमत'च्या प्रतिनिधींनी रात्री डेपो आणि स्टँडवर प्रत्यक्ष फेरफटका मारून येथील वास्तव जाणून घेतले.

बसमधील प्रवासी मंदिरासमोरील परिसरात उतरतात. प्रवेशद्वारापर्यंत अंधार असतो. रात्री बसमधून उतरणाऱ्या महिलांना या सगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. रात्री मुंबईबाहेरहून शेकडो एसटी बस येतात.

प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नसल्याने प्रवाशांमध्ये भीती

एसटी स्टैंड व मंदिर परिसर या ठिकाणी सुरक्षारक्षक किमान रात्री सात वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत तैनात असणे गरजेचे आहे; परंतु बस उभ्या राहतात तो परिसर सोडला तर प्रवेशद्वारावरही सुरक्षा रक्षक तैनात नसतात.

स्टैंड बाहेर असणाऱ्या रस्त्यावरही कोणी नसते. या परिसरात खाजगी वाहने आणि रिक्षा तैनात असतात. रिक्षांसोबत खासगी वाहने रात्री अपरात्री एसटी स्टँडमध्ये सहज प्रवेश करतात.त्यांना या ठिकाणी हटकणारे कोणी निदर्शनास येत नाही. तसेच 

अंधारातच संरक्षक भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्यात आला असून काही ठिकाणी झाडे वाढली आहेत.

लोकमत प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहिलेल्या समस्या

शौचालयासमोरील भागाचे डम्पिंग ग्राऊंड झाले आहे. दत्त मंदिरासमोर स्टँडमध्ये येणाऱ्या एसटी रांगेत उभ्या राहत असून, त्यामागेही एसटीची रांग आहे.

एसटीच्या रांगेमागे जुनाट अशा डम्प करण्यात आलेल्या भंगार वाहनाचा खच पडलेला आहे. दूरदूर हा भाग अंधारात आहे.दुसऱ्या प्रवेशद्वारातून एसटी स्टँडमध्ये येत असून, त्यालगतच्या संरक्षक भिंतीचा परिसरही डम्पिंग ग्राऊंड झाला आहे.

एसटी बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वारावरील शेडमध्ये तैनात सुरक्षा रक्षक वगळला तर उर्वरित कुठेच सुरक्षा रक्षक दिसत नाही.

एसटी स्टैंडबाहेरील रस्त्यावर दिव्यांचा लखलखाट असला तरी रात्रभर हा रस्ता निर्मनुष्य असतो.

आगारात उंचावरील प्रकाशझोत असलेले दिवे आहेत. त्यातील बंद असलेले दिवे तातडीने सुरू करायला हवेत. येथे खासगी वाहनांवर निर्बंध लावण्याची गरज आहे. मुक्कामाच्या बस कुलूप बंद असायला हव्यात. - संदीप पटाडे, छावा मराठा संघटना

आगारातील फलाट सोडले तर आवारात अंधाराचे साम्राज्य आहे. येथे सुरक्षारक्षक असला तरी तो दिसत नाही. आगारात पोलिस गस्त वाढवली पाहिजे. महिला प्रवाशांची विचारपूस करायला हवी. वाहनाची खिडक्या दारे बंद असल्याची काळजी घ्यायला हवी. - सुभाष मराठे निमगावकर, चेंबूर 

टॅग्स :राज्य सरकार