Join us

तिवरांच्या जंगलांवर कुऱ्हाड

By admin | Updated: March 15, 2017 02:45 IST

पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणाऱ्या तिवरांच्या जंगलांवरील संकट दिवसागणिक वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे तिवरांची दिवसाढवळ्या कत्तल होत असून

मुंबई : पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणाऱ्या तिवरांच्या जंगलांवरील संकट दिवसागणिक वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे तिवरांची दिवसाढवळ्या कत्तल होत असून, याकडे संबंधित प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. परिणामी पर्यावरणाला हानी पोहोचत असून, अशीच अवस्था राहिली तर मुंबईसह आसपासच्या परिसराला पुराचा धोका निर्माण होईल, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवरांचे जंगल हे मुंबई शहर आणि उपनगराचे पुरापासून संरक्षण करत असते. केवळ पूरच नाही तर मुंबईची जैवविविधता टिकवण्याचे काम तिवरांची जंगले करत असतात. परिणामी पर्यावरण आणि साहजिकच पक्ष्यांना दिलासा मिळतो. मात्र मागील काही वर्षांपासून विशेषत: मुंबईच्या उपनगरातील म्हणजे पश्चिम उपनगरातील तिवरांची कत्तल केली जात आहे. मुंबईच्या वेशीवर भार्इंदर पश्चिमेकडील अवर लेडी आॅफ नाझरेथ स्कूलच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणावर तिवरांचे जंगल होते. मात्र मागील काही वर्षांपासून येथील तिवरांची झाडे तोडण्यात येत आहेत. आतापर्यंत तोडण्यात आलेल्या तिवरांच्या जागेवर अनधिकृतरीत्या झोपड्या वसवण्यात आल्या असून, याकडे संबंधित प्रशासनाने कानाडोळा केला आहे.पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी तिवरांची झाडे असून, खाडीकिनारी हे प्रमाण अधिक आहे. मात्र सरकारी यंत्रणा तिवरांच्या संरक्षणाबाबत ढिम्म आहेत. परिणामी भूमाफियांकडून तिवरांची कत्तल केली जात आहे. यासंदर्भात सरकार आणि महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु सरकारी अनास्थेमुळे तिवरांची झाडे तोडून त्या जागी झोपड्या उभ्या केल्या जात आहेत. सुरुवातील चार बांबू ठोकून तयार करण्यात आलेल्या झोपड्या कालांतराने पक्क्या बांधकाम स्वरूपात उभ्या राहत आहेत.दरम्यान, आता ज्या जागेवरील तिवरांची झाडे तोडण्यात आली आहेत; तेथून महापालिका कार्यालय आणि पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. तरीही तिवरांची कत्तल खुलेआम करण्यात आली असून, त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. यावर उपाय म्हणून तिवरांच्या जंगलांना संबंधित प्रशासनाने संरक्षण द्यावे, अशी मागणी गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली असून, सरकारने या मुद्द्यांकडे गांर्भीयाने पाहावे, असेही म्हटले आहे. (प्रतिनिधी)