Join us

कुर्बानीच्या मांसाची पोलीस बंदोबस्तात वाहतूक होणार

By admin | Updated: September 2, 2016 06:02 IST

गणेशोत्सवाच्या काळात बकरी ईद येत असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. ईददिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कत्तलखान्यापासून संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्तात

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात बकरी ईद येत असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. ईददिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कत्तलखान्यापासून संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कुर्बानीच्या मांसाची वाहतूक केली जाणार आहे. या दिवशी गोहत्या तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग होऊ नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले.इस्लाम धर्मात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बकरी ईद दिवशी मोठ्या प्रमाणात कुर्बानी दिली जाते. गणेशोत्सव सुरू असताना १२ सप्टेंबरला ईद येत आहे. त्यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आलेले आहे. संवेदनशील भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मोहल्ला समितीशी चर्चा करून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कुर्बानी ही निश्चित केलेल्या महापालिकेच्या कत्तलखान्यातच केली पाहिजे, असे सांगून आयुक्त पडसलगीकर म्हणाले, ‘बकरी ईदच्या दिवशी लाखो बकरे कापले जातात. त्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी आपण देवनार कत्तलखान्याला भेट देऊन पाहणी केली आहे. या ठिकाणी बकऱ्यांव्यतिरिक्त अन्य जनावरांची कुर्बानी देता येणार नाही. वायरलेस व नियंत्रण कक्षातून त्यांच्याशी संपर्क ठेवला जाईल. गोहत्या बंदी व त्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)