Join us  

यंदा कोविडचा देखावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 5:39 PM

गणेशोत्सव मंडळाची लगबग सुरू झाली.

 

मुंबई : गणेशोत्सव एका आठवड्यांवर आला असतांना आता कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची लगबग सुरू झाली आहे. पश्चिम उपनगरात देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्सोवा मेट्रो स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव यंदा कोविड 19 चा देखावा साकार करणार आहे.यंदा या मंडळाचे 40 वे वर्ष आहे.

कोविड 19 मुळे झालेले नुकसान आणि त्यातून सावरत मुंबईकर पुन्हा कसा उभा राहिला आहे. कोविडचा हा तर छोटासा झटका असून जर आपण वेळीच सावध झालो नाही तर मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागेल असा इशारा येथील देखाव्यातून देण्यात येणार आहे. तर मंडपाच्या बाहेरील देखाव्यात कोरोनाशी लढा देणारे डॉक्टर,पोलिस, सफाई कामगार व एनजीओ हे खरे देव आहेत,आणि कोरोनामुळे नद्या,समुद्र आणि पर्यावरण स्वच्छ झाले असून रस्तावर मोर आणि अन्य प्राणी तसेच वर्सोवा समुद्रात डॉल्फिन मासे देखिल नजरेस पडत आहे,हा कोविडचा फायदा देखिल देखाव्यात साकारणार आहे. स्वप्नाक्षय मित्र मंडळ,सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक व पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र(बाळा) आंबेरकर यांनी लोकमतला ही माहिती दिली.

शासन व पालिकेच्या नियमांचे पालन करत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहना नुसार यंदा आमची गणेश मूर्ती सव्वा तीन फुटांची असेल तसेच वर्सोवा बीचवर होणारी विसर्जनाची गर्दी टाळण्यासाठी आम्ही मंडपापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील चाचा नेहरू उद्यानातील तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. गणेश भक्तांची दर्शनाला गर्दी होऊ नये याचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून विशेष म्हणजे नागरिकांसाठी केबल वरून दर्शनाची सोय करण्यात येणार आहे.तसेच येथील सार्वजनिक गणेशोत्सवा बरोबरच आरोग्यउत्सव साजरा करणार असून वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी सॅनिटायझर व मास्कची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे अशी माहिती आंबेरकर यांनी दिली. मंडळाचे अध्यक्ष राजेश ढेरे,सचिव अशोक मोरे व मुख्य सल्लागार संजीव( बिल्लू) कल्ले आणि त्यांचे सहकारी येथील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यागणेशोत्सवमुंबई