मुंबई : कोरोना काळात जिवावर उदार होऊन इतरांचा जीव वाचविणाऱ्या कोविड योद्ध्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. कोविड काळात केलेल्या कामाचा मोबदला त्यांना देण्यात आला नसून, केलेल्या कामाचा मोबदला मिळावा, म्हणून मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही संदेश पाठविण्यात आला आहे. अंधेरीसह जोगेश्वरी पूर्व विभागात कोरोना संसर्गामुळे बाधित होणाऱ्या रुग्णाची संख्या वाढत होती. जोगेश्वरीतील बहुतांश भाग झोपडपट्टीबहुल असल्यामुळे कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, महापालिकेच्या के पूर्व विभागाच्या अंतर्गत विविध विभागांत विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत भर पावसातही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या लोकवस्तीत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे कार्य त्यांनी केले. एमआयडीसी, सीप्झ वसाहत, ठाकूर चाळ, आंबेडकरनगर, महेश्वरीनगर, साळवेनगर, गौतमनगर, कोंडीविटे परिसर, गणेशवाडी, मूळगाव डोंगरी, कामगार वसाहत, चकाला कानकिया, चकाला प्रकाशवाडी, मालप्पा डोंगरी, पंप हाउस, आघाडीनगर, कोंडीविटे केव्हस रोड, सुंदरनगर, सुभाषनगर १/२ या विभागांतील आरोग्य सर्वेक्षण, घरोघरी जाऊन नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, बी.पी.डायबेटिस अन्य आजारांबाबत माहिती घेऊन ती नोंद करण्याचे काम कोविड योद्ध्यांनी केले आहे. अनेक विभागांत व कंपनी, बँक, बस डेपो, हॉटेल्स व एमआयडीसी पोलीस ठाणे आदी ठिकाणी अँटिजन व आरटीपीसीआर तपासणी करण्याचे काम कोविड योद्ध्यांनी केले होते.योद्ध्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना काळात सर्व्हे करून अहवाल सादर करणे, स्थानिक नागरिकांना क्वारंटाइन करणे इत्यादी कामांसाठी मानधन देण्याचे ठरले होते. प्रमाणपत्र देण्याचे ठरले होते. मात्र, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील मानधन देण्यात आले नाही. कोविड योद्धे एमआयडीसी आरोग्य केंद्रासोबत एनवायके संस्थेच्या नावाखाली काम करत होते. आता योद्ध्याची स्थिती वाईट असतानाच, प्रशासनाने हात वर केले आहेत. दरम्यान, या कोविड योद्ध्यांमध्ये भानुदास सकटे, सुनील बोर्डे, गौतम पाईकराव रोशन हे काम करत होते.
कोविड योद्धा राहिला मानधनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 01:50 IST