Join us  

कोरेगाव भीमा तपास प्रकरण : केंद्रीय गृहमंत्रालयाचे पत्र पोलीस महासंचालकांकडे आले

By अतुल कुलकर्णी | Published: January 29, 2020 1:20 AM

मुंबईत असलेली एनआयएची टीम पुण्याला भीमा कोरेगाव (एल्गार परिषद) प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रे घेण्यासाठी गेली.

- अतुल कुलकर्णीमुंबई : कोरेगाव भीमाचा तपास एनआयए कडे देण्यासंबंधीचे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांच्याकडे पाठवले असून ते शुक्रवारी (२४ जानेवारी) सायंकाळीच मिळाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पण सोमवार दिनांक २७ जानेवारी रोजी पुण्यात गेलेल्या एनआयएच्या टीमला या तपासाची कागदपत्रे देण्यास पुणे पोलिसांनी नकार दिला होता. राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे पत्र आल्यानंतर त्यांनी ते पत्र मंत्रालयात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ‘पुढील आदेशासाठी सादर’ असे म्हणून पाठवल्याची माहिती आहे.दरम्यान, मुंबईत असलेली एनआयएची टीम पुण्याला भीमा कोरेगाव (एल्गार परिषद) प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रे घेण्यासाठी गेली. त्यावेळी पुणे पोलिसांनी कागदपत्रे देण्यास असमर्थता दर्शवली. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या अनेक केसेस आहेत. त्यातील एलगार परिषदेशी संबंधित खटला वर्ग करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी नागपूर येथे बोलताना केंद्राचे कोणतेही पत्र राज्याला आले नाही, असे सांगितले होते. वास्तविक हे पत्र २४ तारखेला आल्याची माहिती आहे. आता पुणे पोलिसांनी कागदपत्रे देण्यास नकार दिल्यामुळे ते पथक न्यायालयापुढे जाऊ शकते. तेथे गेल्यानंतर न्यायालय संबंधित कागदपत्रे तिकडे द्या, असे आदेश देऊ शकते.

टॅग्स :कोरेगाव-भीमा हिंसाचार