शिवाजी गोरे - दापोली -आंबा शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल १६ वर्षांनी हापूसला पर्याय देणारी ‘कोकण सम्राट’ ही नवी जात शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधक शास्त्रज्ञ डॉ. अविनाश शिंदे, डॉ. मुराद बुरोंडकर व डॉ. भरत साळवी यांनी ही किमया साधली आहे. साकाविरहित व दरवर्षी आंबा उत्पादन देणाऱ्या या जातीचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. हापूस आणि टॉमी अॅटकिन्स यांच्या संकरातून ही जात विकसित करण्यात आली आहे. फळे मध्यम आकाराची २८४.५० ग्रॅम, गराचे प्रमाण ७३.२८ टक्केअसून एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण २०.३० ब्रिक्स आहे. फळाची आम्लता ०.२५ टक्के असून, या वाणामध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण जास्त म्हणजे २७.५२ टक्के असून, ही जात नियमित फळधारणा करते. हापूस मादी वाण असलेला दुसरा संकर आणि परदेशी मादी वाण असलेला हा पहिला संकर आहे. फायबरचे प्रमाण कमी, चव गोड, रंग आकर्षक असल्याने हा आंबा मन मोहून टाकतो. कोकणात आढळणाऱ्या फळमाशी, करपा, बुरशी या रोगांचा परिणाम या जातीवर होत नाही. त्याची रोग प्रतिकारकारक शक्ती चांगली असल्याने इतर आंब्यांच्या तुलनेत रोगांचे प्रमाण कमी आहे. विद्यापीठाच्या वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रात १९९७ साली शास्त्रज्ञ शिंदे व बुरोंडकर यांनी संशोधनाला सुरुवात केली. ९८ ला जात संकरित करण्यात आली. यावर सखोल संशोधन करून ७० संकर तयार केले. १६ वर्षांच्या अथक संशोधनाला कृषी विद्यापीठ संशोधन परिषदेत या जातीला अधिकृत मान्यता देण्यात आली. हापूसचे दोष दूर होणार हापूस आंबा कलम एक वर्ष आड पीक देते. तसेच हापूसमध्ये साका धरला तर तो भाग काढून टाकावा लागतो. हे हापूसचे मुख्य दोष आहेत. ते या नव्या जातीमध्ये काढून टाकण्यावर शास्त्रज्ञांचा भर होता आणि त्यालाही यश आले आहे. ‘कोकण सम्राट’च्या जातीला दरवर्षी आंबे लागतील आणि त्याला साका धरणार नाही. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ‘कोकण सम्राट’ ही नवी जात येथील शेतकऱ्यांना वरदान ठरू शकेल. हापूस आंब्यातील उणिवा या जातीत भरून काढण्याचा शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला आहे. या जातीची लागवड केल्यावर शेतकऱ्यांना फायदा मिळेल. - डॉ. किसन लवांदे, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
हापूसमधील उणिवा दूर करणार ‘कोकण सम्राट’
By admin | Updated: August 20, 2014 00:27 IST