Join us

कोकणातल्या पुरणपोळ्या थेट मुंबई-पुण्यात

By admin | Updated: September 3, 2015 23:19 IST

मुंबई दूरदर्शन केंद्रानेही घेतली दखल...

मार्च २०११ ला मुंबई दुरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी सरस्वती महिला बचत गटाला भेट दिली. या महिलांच्या धडपडीचे त्यांनी कौतुक केले आणि या बचत गटाची प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली. साऱ्यांच्याच प्रोत्साहनामुळे या महिला बचत गटातील महिलांमध्ये आता हुरूप आला आहे. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढल्याने काहीतरी नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्याची तळमळ त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. या बचत गटातील सर्व महिला सदस्या खऱ्या अर्थाने उद्योगिनी आहेत. त्यामुळे वेगळ्या उपक्रमासाठी, व्यवसायांसाठी प्रशिक्षण मिळाल्यास ते घेण्याची सर्व सदस्यांची तयारी असल्याचे सरस्वती महिला बचत गटाच्या खजिनदार कलाश्री जोगळेकर या सांगतात. या महिलांना शलाका शेडगे यांचेही सातत्याने मार्गदर्शन मिळते. ग्रामीण भागात बचत गटांचे कार्य विस्तारू लागले आहे, हे यातून निदर्शनास येते.छोट्याशा गावात राहुनसुद्धा बचतगटाच्या माध्यमातून अगदी चांगल्या प्रकारे लघुउद्योग करता येऊ शकतो. हे साखरपा (कोंडगाव) गावातील सरस्वती महिला बचत गटाने दाखवून दिले आहे. त्यांनी तयार केलेल्या पुरणपोळ्यांचा आस्वाद मुंबई व पुणे येथील लोकांनी घेतला आहे. त्यामुळे पुरणपोळ्यांसाठी पुन्हा पुन्हा मागणी वाढत आहे. या महिलांना कोणत्या उत्पादनांना वाढती मागणी आहे, हे आता माहीत झाल्याने यातून चांगल्या प्रकारे व्यवसाय होत आहे. याचबरोबर पापड, फेण्या, विविध प्रकारची लोणची ही उत्पादनेही आता मुंबईत जाऊ लागली आहेत. या बचत गटाची दखल मुंबई दुरदर्शननेही घेतली आहे.महिला आता काही ना काही व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊ लागल्या आहेत. अशाच उद्देशाने साखरपानजिकच्या कोंडगाव येथील सरस्वती महिला बचत गटाची स्थापना २००८ साली मातृमंदीर संस्थेच्या सहकार्यातून झाली. या बचत गटामध्ये अध्यक्षा सरीता शिंदे, सचिव रुपाली डिगे, खजिनदार कलाश्री जोगळेकर, दीपा खरात, ज्योती शिंदे, भारती खेडेकर, संगीता सावंत, चंदा शिंदे, सुजाता फडके, अश्विनी डिगे, स्रेहल पेंडसे या महिला कार्यरत आहेत.बचतगट स्थापन झाल्यानंतर गटातील महिलांनी फिनेल, उदबत्ती, नीळ, लिक्वीड तयार करुन त्यांची विक्रीही केली. त्यातून अपेक्षेप्रमाणे उत्पन्नही मिळाले. यानंतर काहीतरी वेगळे करायला हवे, ही धडपड त्यांना स्वस्थ बसू देईना. कोकणात सर्व सणांना विशेषत: गणपती, होळी तसेच लग्नसमारंभात पुरणपोळ्यांना पसंती असते. मात्र, त्यासाठी लागणारा वेळ आणि कौशल्य यामुळे बरेचदा पुरणपोळीचा बेत आखणे प्रत्येक गृहिणीला शक्य होतेच, असे नाही. मात्र, हीच बाब लक्षात घेऊन या बचत गटाने पुरणपोळ्या बनवून त्यांची विक्री करण्यास सुरूवात केली. आणि यात त्यांना यशही आले. इथल्या लोकांची मुंबईकरांशी नाळ जुळलेली असल्याने होळी, गणेशोत्सव आदी सणांना मुंबईकर मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी येत असतात. त्यामुळे या बचत गटाच्या पुरणपोळ्यांची ख्याती त्यांच्यापर्यंत पोहोचली. मऊ खुमासदार अशा या पुरणपोळ्यांना त्यांच्याकडून पसंती मिळालीच, पण त्यांनी मुंबई, पुणे आदी ठिकाणच्या आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींपर्यंतही या पुरणपोळ्यांची खासियत पोहोचवली. त्यामुळे या शहरांमधून पुरणपोळींच्या आॅर्डर्स येणे सुरू झाले आहे. या आॅर्डर्सप्रमाणे पुरणपोळ्या बनवून त्या मुंबई व पुणे या शहरांमध्ये व्यवस्थित पॅकिंग करुन पाठवल्या जातात.साखरपा परिसरातील आजुबाजुच्या भागात तीन जत्रा भरतात, सतीमातेची जत्रा, भगवती देवीची जत्रा आणि महाशिवरात्र. यावेळी आजुबाजुच्या गावातील सर्व धर्माचे लोक या जत्रांना हजेरी लावतात. या जत्रांमध्येही सरस्वती महिला बचत गटाच्या महिला नाश्ता बनविण्याचा स्टॉल लावतात. यामध्ये वडापाव, भजी, भेळ, साबुदाणा वडा, खोबरावडी असे पदार्थ विक्रीसाठी ठेवले जातात. बचत गटातून काम करतानाच या महिला घरगुती व्यवसायातही काही ना काही करतात. तसेच एकमेकींच्या व्यवसायाला हातभार लावतात. या महिला बचत गटाची वार्षिक उलाढाल दोन लाखांपर्यत सहजपणे होते.सुरूवातीला सर्व सदस्यांना परवडेल एवढी मासिक वर्गणी ठेवली होती. मात्र, तिसऱ्या वर्षापासून १०० रुपये वर्गणी करण्यात आली आहे. गटातील सभासदांना त्यांच्या गरजेनुसार २ टक्के व्याजाने कर्ज दिले जाते. या सर्व सदस्या कर्जाचे मुद्दल व व्याज नियमीतपणे भरतात. वर्षातून एकदा हळदीकुंकू समारंभ, तसेच विविध कार्यक्रमांचे औचित्य साधून संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा वगैरे घेतल्या जातात. आता हे गटाचे आठवं वर्ष आहे. सदस्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे या बचत गटानेच आता गेल्या महिन्यात महालक्ष्मी स्वयंसहायता बचत गटाची स्थापना केली आहे. सुवर्णा पांचाळ या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. स्नेहल पेंडसे (सचिव), शीतल पांचाळ (खजिनदार), सुजाता फडके, प्रवीणी शिंदे, चंदा शिंदे, ज्योती शिंदे, साक्षी डिगे, भारती खेडेकर, धनश्री केतकर, विजया चिले यांचा या बचत गटात समावेश आहे. आता या बचत गटाचे दोन गट तयार झाले असले तरी या सर्व महिला एकत्रित येऊन दोनही बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यातील एकविचारामुळे हा बचत गट खऱ्या अर्थाने उन्नतीच्या दिशेने जात आहे.या बचत गटातील महिलांची धडपड लक्षात घेऊन देवरूख येथील मातृमंदीरच्या बचतगट महासंघाने त्यांना लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य केले आहे. या संस्थेच्या सहकार्यातून बचतगटाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. या संस्थेचे मार्गदर्शन या महिलांना सातत्याने मिळत असते. त्यामुळे या महिला आपल्या व्यवसायांमध्ये वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.- शोभना कांबळेआमच्या सरस्वती महिला बचत गटाच्या सर्वच सदस्यांमध्ये एकोपा आहे. त्यामुळे कुठलाही व्यवसाय करताना त्यात अडचण येत नाही. सध्या आम्ही खाद्यपदार्थ्यांची विक्री करत आहोत, त्यातून नफाही चांगला मिळत आहे. मात्र, यापेक्षाही वेगळा व्यवसाय करण्यासाठी आम्हाला कुणी मार्गदर्शन केल्यास त्या व्यवसायात आम्ही नक्कीच उतरू. आत्तापर्यंतच्या वाटचालीत आम्हांला अनेकांचे सहकार्य मिळाले म्हणुनच आम्ही प्रगती करू शकलो. - सरीता शिंदे, अध्यक्ष