Join us

कोकण आॅनलाईन

By admin | Updated: January 20, 2015 00:05 IST

महावितरण कंपनी : गतवर्षीपेक्षा वीजबिलापोटी तीन कोटीने वाढला महसूल

रत्नागिरी : रांगेत उभे राहण्यापेक्षा घरबसल्या इंटरनेटद्वारे वीजबिल भरण्याकडे कोकणवासीयांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. वास्तविक भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ वाडी-वस्तीवर वसलेला प्रभाग असताना तसेच इंटरनेटच्या समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेत. कोकणातून गतवर्षी १५ कोटी ८४ लाखांचा महसूल जमा करण्यात आला होता. यावर्षी त्यामध्ये वाढ झाली असून, १८ कोटी ९३ लाखाचा महसूल जमा करण्यात आला आहे.ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरता यावे, याकरिता महावितरणने आॅनलाईन वीजबिल भरणा केंद्र सुरु केली आहेत. त्यामुळे इंटरनेट सुविधा असलेल्या ग्राहकांना घरी बसून वीजबिल भरणे सुलभ झाले आहे. महावितरण कंपनीच्या अन्य विभागांच्या तुलनेत कोकण विभाग आॅनलाईन बिल भरण्यात आघाडीवर आहे. कोकण विभागातील अनेक ग्राहक आता आॅनलाईन वीजबिल भरण्याकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.२०१३ मध्ये १ लाख ४८ हजार ७६० ग्राहकांनी १५ कोटी ८४ लाखाचा महसूल जमा केला होता, तर २०१४ मध्ये २ लाख ४२ हजार २९१ ग्राहकांनी या सुविधेद्वारे १८ कोटी ९३ लाखाचा महसूल जमा केला असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.राज्यातील अमरावती, औरंगाबाद, बारामती, भांडुप, जळगाव, कल्याण, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या विभागांच्या तुलनेत कोकण विभागाचा महसूल कमी असला तरी येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन व इंटरनेट सोयीसुविधा पाहता उत्कृ ष्ट असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. सुरुवातीला आॅनलाईनकडे ग्राहकांचा कल कमी असला तरी दिवसेंदिवस मात्र तो वाढत आहे. या आॅनलाईन सेवेमुळे ग्राहकांचा वेळही वाचत आहे. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.गेल्या दोन वर्षांच्या या आकडेवारीवरून आॅनलाईन सेवेकडे ग्राहक वळत असल्याचे दिसून येत आहे. कोकणात अन्य विभागांच्या तुलनेत अशा ग्राहकांची संख्या जास्त आहे. भविष्यात ही संख्या अजून वाढेल, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)