Join us

शिमग्याआधीच कोकण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:07 IST

उष्णतेच्या लाटांचा त्रास ४८ तास कायम; पालघर ४१, मुंबई ३८ अंश सेल्सिअसवरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर ...

उष्णतेच्या लाटांचा त्रास ४८ तास कायम; पालघर ४१, मुंबई ३८ अंश सेल्सिअसवर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअस एवढा नोंदविण्यात आला असतानाच दुसरीकडे संपूर्ण कोकण प्रांतात आलेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रासले आहेत. रत्नागिरीतील कमाल तापमानाचा पारा गुरुवारी ३८ अंश नोंदविण्यात आला असून, पुढील ४८ तास उष्णतेची लाट संपूर्ण कोकण प्रांतात कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणात शुक्रवारसह शनिवारी उष्णतेच्या लाटेची नोंद होईल. हवामान मॉडेल मार्गदर्शनानुसार, कोकण भागावर ईशान्य व उत्तरेकडून गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईसह पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील तापमानात वाढ होऊ शकते. गुरुवारी दुपारी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३९ अंश एवढा नोंदविण्यात आला. गुरुवारी उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणात उष्णतेची लाट नोंदविण्यात आली असून, पालघर येथे दुपारी कमाल तापमान ४१ अंश नोंदविण्यात आले.

मुंबई आणि लगतच्या परिसरात कमाल तापमानाचा पारा चढा असून, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात कमाल तापमानाने कहर केला आहे. शुक्रवारी आणि शनिवारीही अशीच परिस्थिती राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

----------------

शहरांचे कमाल तापमान

सांगली ३७.७

डहाणू ३७.८

पुणे ३७.१

जळगाव ३८.२

नाशिक ३६.४

मुंबई ३८.७

रत्नागिरी ३७.३

सातारा ३६.१

मालेगाव ३६.८

अलिबाग ३८.८

नांदेड ३८.५

जालना ३६