Join us

शाळा की कोंडवाडा ?

By admin | Updated: July 17, 2015 23:06 IST

एकीकडे पटसंख्येअभावी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना बल्याणी येथील उर्दू शाळेतील पटसंख्या चांगली असतानादेखील तिची अवस्था कोंडवाड्यासारखी आहे.

- प्रशांत माने, कल्याणएकीकडे पटसंख्येअभावी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना बल्याणी येथील उर्दू शाळेतील पटसंख्या चांगली असतानादेखील तिची अवस्था कोंडवाड्यासारखी आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे येथील विद्यार्थ्यांना दाटीवाटीने शिक्षण घ्यावे लागत आहे.बल्याणीमध्ये उर्दू माध्यमाची बंदे अली खान तर मराठी माध्यमाची महात्मा गांधी या दोन्ही प्राथमिक शाळा एकाच वास्तूमध्ये आहेत. मराठी माध्यमाचे ३०० तर उर्दूचे तब्बल १३३८ विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे समीकरण पाहता या ठिकाणी ३६ शिक्षकांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात, येथे केवळ १० शिक्षक आहेत. शाळेत ६ वर्गखोल्या आहेत. गेल्या चार वर्षांत पटसंख्या वाढली, पण त्यामानाने शिक्षकांची संख्या मात्र वाढलेली नाही. त्यांची कमतरता तसेच वर्गांची वानवा, परिणामी एका वर्गात १०० च्या आसपास विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवून उपलब्ध शिक्षकांमार्फत शिक्षण दिले जात आहे. या वर्गांत जागा नसल्याने शाळेच्या गच्चीवरदेखील पत्र्याची शेड टाकून विद्यार्थ्यांना बसविले जात आहे. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतेच, त्याचबरोबर आरोग्यही धोक्यात आले आहे. एक प्रकारे शिक्षण हक्क कायद्याचीदेखील या ठिकाणी पायमल्ली होताना दिसते. वर्गखोल्या वाढविणे तसेच शिक्षक भरती संदर्भात संबंधित शाळेबरोबरच शिक्षणप्रेमींचा दीड वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु, शिक्षण मंडळ प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. शाळेला केवळ एक संगणक दिलेला असून तो बंद आहे.