Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला ओळखून धोरण निश्चिती आवश्यक - वेद प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 03:02 IST

विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे, पण ही प्रतिभा विखुरलेली आहे. या प्रतिभेचा विचार करून धोरण निश्चिती करणे आवश्यक आहे. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे, पण ही प्रतिभा विखुरलेली आहे. या प्रतिभेचा विचार करून धोरण निश्चिती करणे आवश्यक आहे. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण ७१ टक्के असले तरी मुंबई, पुणे, भंडारा, गडचिरोली, लातूर आणि उस्मानाबाद अशा विखुरलेल्या स्वरूपात ही प्रतिभा आहे. या सर्व जिल्ह्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर हेच दिसून येते. त्यामुळे या विविधतेनुसार शिक्षणाची पायाभरणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. वेद प्रकाश यांनी केले. मुंबई विद्यापीठ १६१ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. वर्धापन दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी ‘जागतिकीकरणाच्या संदर्भात शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने’ विषयावर प्रा. वेद प्रकाश यांचे व्याख्यान होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि अमिटी विद्यापीठ मुंबई येथील कुलगुरू डॉ. विजय खोले हे होते. या वेळी बोलताना प्रा. वेद प्रकाश यांनी सांगितले, सर्वसामान्यांना परवडेल अशा खर्चात गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे हेसुद्धा एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी देश आणि राज्यपातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे असून त्यासाठी शासनाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षणाची महत्त्वाची भूमिका आहे. जगाच्या नकाशावर भारताला सक्षम आणि विकासाच्या दृष्टिकोनातून उभे राहायचे झाल्यास शिक्षण हे महत्त्वपूर्ण असणार आहे. अन्य विद्यापीठांच्या तुलनेत आपले स्थान काय आहे हे ओळखणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कॅम्पसमधील विविधतेवर लक्ष केंद्रित करणे, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित प्राध्यापकांची नियुक्ती करणे, समाजभिन्मुख संबंध प्रस्थापित करणे, मार्गदर्शक तत्त्वे काय असावीत याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.जगाच्या तुलनेत भारताचा ‘ग्रॉस एनरॉलमेंट रेशो’ हा २४ टक्के एवढा आहे. तर अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि चायना हे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले आहेत. जागतिक स्पर्धेत राहण्यासाठी भारतीय विद्यापीठांना काही महत्त्वपूर्ण बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मुंबई विद्यापीठाच्या १६१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाने, विद्यापीठातील गुणवंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आणि मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त करून (केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा २०१६) परीक्षेत यश मिळविलेल्या मान्यवरांचा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.