Join us  

महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणाऱ्या सावंतांची संपत्ती, जाणून घ्या किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 3:50 PM

तानाजी सावंत यांनी एका प्रचारसभेवेळी मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन असे वक्तव्य केलं होतं.

मुंबई - जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तानाजी सावंत हे पैशाने गर्भश्रीमंत असल्याची नेहमीच चर्चा असते. साखरसम्राट म्हणूनही त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेला सर्वाधिक पक्षनिधी देणारा नेता म्हणूनही त्यांचं नाव आघाडीवर असतं. आता, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते 243 भूम परंडा-वाशी या मतदारासंघातून निवडणूक लढवत आहेत. 

तानाजी सावंत यांनी एका प्रचारसभेवेळी मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन असे वक्तव्य केलं होतं. 'एका खरेदी व्यवहारासंदर्भात बोलताना, काही लोकांचा असा समज झाला असेल, तानाजी सावंत काय भिकारी-बिकारी झालाय का?, मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही, असे सावंत यांनी एका प्रचारसभेवेळी म्हटले होते.' त्यामुळे सावंत यांच्यावर टीकाही झाली होती. तसेच, त्यांच्या संपत्तीची चर्चाही या काळात रंगली होती. आता, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सावंत यांनी प्रतिज्ञापत्र जोडले आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार सांवत हे अब्जाधीश आहेत. तानाजी सावंत यांची एकूण संपत्ती 180 कोटी 72 लाख एवढी आहे. 

सावंत यांची जंगम मालमत्ता

शपथ पत्रातील 1 ते 9 अनुक्रमांकानुसार सावंत यांच्याकडील जंगम मालमत्ता 127 कोटी 15 लाख, 83 हजार, 219 रुपये एवढी आहे. तर, त्यांच्या पत्नीच्या नावे 31 लाख  73 हजार 900 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये रोख रक्कम केवळ 50,000 रुपये असून इतर रक्कम ही बँकेच्या ठेवी, शेअर्स, मालमत्तेचे भाडे, साखर कारखाने, गाड्या आणि दागिने स्वरुपात आहे. 

सावंत यांची स्थावर मालमत्ता

शपथपत्रातील एक ते पाच अनुक्रमांकानुसार सावंत यांच्याकडे 53 कोटी 56 लाख 66 हजार 100 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर, त्यांच्या पत्नीच्या नावे 5 कोटी 68 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये शेतजमीन, घर आणि विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या जागांचा समावेश आहे. 

सावंत यांच्यावरील कर्ज 

सावंत यांना विविध बँका आणि वित्तीय संस्थांचे मिळून 11 कोटी 66 लाख 45 हजार 693 रुपयांचे कर्ज आहे. तर, त्यांच्या पत्नीवर कुठल्याही वित्तीय संस्थेचं कर्ज नाही. 

दरम्यान, सावंत यांच्या महाराष्ट्राबद्दलच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तानाजी सावंत सध्या यवतमाळमधून शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार असून महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आहेत. सावंत यांच्या या वक्तव्याविरोधात मनसेने जोरदार निदर्शने करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. दरम्यान, सावंतानी त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. तसेच, पूर्ण भाषण ऐकल्यानंतर संदर्भ लक्षात येईल असेही ते म्हणाले होते. 

टॅग्स :शिवसेनाविधानसभा निवडणूक 2019उस्मानाबादमंत्री