Join us

'असा' येतो मधाच्या शेतीतून थेट तुमच्या घरी मध; जाणून घ्या मधाचा प्रवास

By स्नेहा मोरे | Updated: January 18, 2024 20:19 IST

मध महोत्सवाला मुंबईकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई - मधाचा मधुर गोडवा आजीच्या बटव्यापासून ते आजही प्रत्येकाच्या घरात जपला गेला आहे. यशवंतरा चव्हाण येथे आयोजित केलेल्या मध महोत्सवाला मुंबईकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. अगदी लहानग्यांपासून ते ज्येष्ठापर्यंतचा मधाचा प्रवास जाणून घेण्यासाठी उत्साहाने गर्दी केली होती. या महोत्सवाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांनी शेतातून आणलेला मध चाखण्याची संधीही महोत्सवाला भेट देणाऱ्यांना मिळाली. याखेरीज, मधाच्या शेतीतून घरापर्यंत मध येण्याचा रंजकही प्रवासही या महोत्सवाच्या निमित्ताने उलगडताना दिसला.

मध महोत्सवात मधमाशांचे पालन कसे करावे, मधकेंद्र योजनेत सहभाग होण्यासाठी काय करावे, कोणत्या प्रकारच्या मधमाशा असतात, मधाची तपासणी कशी केली जाते, मधाच्या पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह अशा अनेक गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवण्यास , समजून घेण्यास मिळणार आहेत. याखेरीज, राज्याच्या विविध जिल्ह्यातील मधाच्या शेतीतून शेतकऱ्यांनी आणलेला मध चाखण्यास मिळेल.

मधाची लिपस्टीक, चॉकलेट अन् साबण

या महोत्सवात मधापासून तयार करण्यात आलेले चॉकलेट, आवळा कँडी, जांभूळ, ओवा, सूर्यफुल, तुळशी असे विविध प्रकारचे मध, मधापासून तयार केलेला लिपस्टीक, साबण, सुगंधी मेणबत्त्या तसेच मधमाशीचे जीवन कार्य, मधाची चाचणी तसेच मधपेटी अशा विविध बाबींचे प्रदर्शन बघणाऱ्यांच्या ज्ञानात भर घालते. या महोत्सवात सहभागी तज्ज्ञ आपल्या घरात- गच्चीत वा बाल्कनीत मधुमक्षिका पालन कसे करावे याचेही मार्गदर्शन करतात.

असा होतो मधाचा प्रवास

शेतकऱ्यापासून घरात मध येईपर्यंत सुरुवातीच्या टप्प्यात मधमाशांनी जमवलेला मध, कोणतीही प्रक्रिया न केलेला कच्चा मध असतो. हा मध चिकट असल्यामुळे तो गाळणे कठीण असते. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी मध थोडा तापवला जातो, त्यानंतर मधातील परागकण, एन्झाइम्स किंवा इतर उपयुक्त मूल्ये न काढता केवळ मेणाचे तुकडे काढून टाकले जातात आणि पाण्याचे प्रमाण कमी केले जाते. या प्रक्रियेनंतर मधातील चाळले न गेलेले बारीक तुकडे , अतिसूक्ष्म कण गाळून मध स्वच्छ केला जातो. या टप्प्यानंतर गाळलेला मध तापवला जातो. त्यातून ओलावा निघून जातो, तसेच त्यातील यीस्टसुद्धा तपासले जाते. हा मध थंड होण्यासाठी ठेवला जातो. त्यानंतर बाटलीत भरुन विक्रीसाठी पाठवला जातो. अखेरीस विक्रीकरिता कॅपिंग, लेबलिंग, पॅकेजिंग, स्टोअरिंग आणि डिलिव्हरी हे टप्पे आहेत.