Join us  

मुंबई-अहमदाबाद दुसरी वंदे भारत ट्रेन, PM मोदी करणार लोकार्पण; पाहा, थांबे अन् वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 2:11 PM

Vande Bharat Express Train: मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील दुसऱ्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

Vande Bharat Express Train: एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापताना दिसत असून, दुसरीकडे देशभरातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन करण्यात येत आहे. १२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५०६  रेल्वेच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यात एकूण ८५ हजार कोटींच्या प्रकल्पांचा समावेश आहे. तर, १० वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील दुसऱ्या वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे.

विद्यमान स्थिती मुंबई ते गांधीनगर कॅपिटल या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहे. ३० सप्टेंबर २०२२ पासून या ट्रेनची सेवा सुरू असून, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई ते अहमदाबाद हा व्यस्त मार्गांपैकी एक असल्यामुळे या मार्गावर दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येत आहे. ही वंदे भारत ट्रेन अहमदाबादहून सकाळी सुटून मुंबईत येईल आणि दुपारी मुंबईतून सुटून रात्री परत अहमदाबादला पोहोचेल. 

मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील दुसऱ्या वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक कसे असेल?

अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. या वंदे भारत ट्रेनचा क्रमांक अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल मार्गासाठी २२९६२ असा असणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस अहमदाबादहून सकाळी ०६ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि ११ वाजून ३५ मिनिटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचेल. तसेच मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गासाठी वंदे भारत ट्रेनचा क्रमांक २२९६१ असा असणार आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल येथून दुपारी ०३ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि रात्री ०९ वाजून २५ मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच असतील.

दरम्यान, लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. बडोदा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉपचा उद्घाटन सोहळा होणार आहे. मध्य रेल्वेच्या दोन प्रमुख मालवाहतूक डेपोची म्हणजेच भुसावळ आणि नागपूर वॅगनची उपलब्धता वाढणार आहे. 

 

टॅग्स :वंदे भारत एक्सप्रेस