Join us

नाइट लाइफला गृहविभागाचा तीव्र विरोध

By admin | Updated: April 30, 2015 02:07 IST

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, पोलीस दलावरील ताण वाढेल, अशी भूमिका घेत मुंबई शहरातील प्रस्तावित नाईट लाईफला राज्याच्या गृह विभागाने तीव्र विरोध दर्शविला आहे़

मुंबई : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, पोलीस दलावरील ताण वाढेल, अशी भूमिका घेत मुंबई शहरातील प्रस्तावित नाईट लाईफला राज्याच्या गृह विभागाने तीव्र विरोध दर्शविला आहे़ याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे़ याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली़ युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफबाबत आग्रही भूमिका घेतली होती़ त्याची रि ओढत मुंबई महापालिकेने याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे पाठवला होता़ राज्य सरकारने होकार दिल्यास नाईट लाईफला आमची हरकत नाही, अशी भूमिका पालिकेने घेतली होती़ मुंबई पोलिसांनी यासंदर्भात अशाच आशयाचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठवला़, असे सूत्रांनी सांगितले़ मुंबई शहरातील नाईट लाईफ ही संकल्पना विशिष्ट उच्च वर्गासाठी आहे़ सामान्य माणसाच्या जीवनाशी हा विषय निगडीत नाही़ नाईट लाईफचा गैरफायदा असामाजिक घटक अधिक प्रमाणात घेऊ शकतात, अशी शंका गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे समजते़ विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाच्या तीन प्रमुख आमदारांनी मुंबईतील नाईट लाईफला विरोध दर्शवला होत़ा आता त्यापाठोपाठ गृहविभागानेही या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे़ (विशेष प्रतिनिधी)