डोंबिवली : लोकलवर दगड फेकून प्रवाशांवर जीवघेणा हल्ला करणा-या किसन थापा (२२) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दारूचे व्यसन पूर्ण करण्यासाठी तो लोकलवर दगड फेकून प्रवाशांना खाली पाडून लुटत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबईकडून बदलापूरकडे जाणा-या लोकलवर बदलापूर स्थानकापूर्वी एका व्यक्तीने दगड फेकल्याची घटना घडताच प्रवाशांनी आरडाओरड केली. यामुळे ड्यूटीवर असलेल्या आरपीएफ जवानाने चोरट्याचा पाठलाग करत काही अंतरावर जाऊन त्याला पकडले. मात्र या चोरट्याने या पोलिसाच्या हाताला चावा घेत पुन्हा पळ काढला. त्याचवेळी सचिन पवार या तरुणानेही पोलिसाबरोबर चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यास मदत केली. आरपीएफने या चोरट्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले असून, किसन थापा असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी लोकलच्या दरवाजातून प्रवास करणा-या दर्शना पवार हिच्यावर बाहेरून फेकलेला दगड बसल्यामुळे चालत्या लोकलमधून पडून तिला जीव गमवावा लागला होता. चोरट्याला पकडण्यास पोलिसांना मदत करणारा सचिन पवार हा मयत दर्शना हिचा भाऊ आहे.
लोकलवर दगड फेकणाऱ्या किसन थापाला अटक
By admin | Updated: June 29, 2015 04:45 IST