Join us  

'किरीट सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम, ठाण्यात दाखवून शॉक दिला पाहिजे'  

By महेश गलांडे | Published: November 13, 2020 4:45 PM

किरोट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली, त्यानंतर शिवसेना नेत्यांचा पारा चांगलाच चढला असून परिवहनमंत्री अनिल परब यांच्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनीही किरीट सोमय्यांवर बाण चालवले.

ठळक मुद्देकिरोट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली, त्यानंतर शिवसेना नेत्यांचा पारा चांगलाच चढला असून परिवहनमंत्री अनिल परब यांच्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनीही किरीट सोमय्यांवर बाण चालवले.

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे टोकाला गेले आहे. त्यातच आता अर्णब गोस्वामी प्रकरणावरून भाजपाचे नेते शिवसेनेला सातत्याने लक्ष्य करत असल्याने आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. थेट ठाकरे कुटुंबीयांनाच लक्ष्य करत असलेल्या किरीट सोमय्या यांना राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी रोखठोक इशारा दिला आहे. सातत्याने राळ उडवत असलेल्या किरीट सोमय्या यांच्या आरोपांची मालिका संपू द्या मग आम्ही एकदाच त्यांना शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ असा इशारा अनिल परब यांनी दिला. तर, मंत्री गुलाबराव पाटील यांनीही किरीट सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं म्हटलंय. 

किरोट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली, त्यानंतर शिवसेना नेत्यांचा पारा चांगलाच चढला असून परिवहनमंत्री अनिल परब यांच्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनीही किरीट सोमय्यांवर बाण चालवले. किरीट सोमय्यांचं वक्तव्य बेताल असून त्यांच्या डोक्यावर कायमस्वरुपी परिणाम झालाय. किरीट सोमय्यांना ठाण्याला दाखवलं पाहिजे, तिथं त्यांच्या डोक्याला शॉक दिल्यानंतरच त्यांचं हे वक्तव्य बंद होईल. ज्या ठाकरेंच्या पायाशी बसून तुम्ही खासदार झालात, त्या ठाकरे कुटुंबीयांवर तुम्ही आरोप करतात. मला तरी वाटतं, हे एहसान फरामोश माणूस आहे. या अहसान फरामोश माणसाने उद्धव ठाकरेंवर टीका करु नये, अगोदर आपली औकात पहावी, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी सोमय्यांना लगावला. 

अनिल परब यांचा इशारा

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आज पुन्हा एकदा ठाकरे कुटंबावर टीकेची राळ उडवल्यानंतर अनिल परब यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी सुरी केलेली आरोपांची मालिका आधी संपू द्या. मग आम्ही त्या आरोपांची चिरफाड करू. दिवाळीचे हे चार दिवस संपू द्या मग त्यांना एकदाच शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल. तसेच आता आम्ही जे आरोप करू ते सहन करण्याची तयारीही त्यांनी ठेवली पाहिजे, असे अनिल परब यांनी म्हटलंय.

किरीट सोमय्या महाभारतातील शिखंडी 

किरीट सोमय्या यांच्या आरोपावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घणाघात टीका केली. त्या म्हणाल्या की,  किरीट सोमय्यांनी आरोप केले म्हणजे मी आरोपी होत नाही, किरीट सोमय्यांना केवळ आरोप करण्यासाठी नेमलं आहे. कुठलीही जनहित याचिका केली आम्ही त्या सगळ्यांना सामोरं जायला तयार आहोत, त्यांनी आरोप केले त्यावर उत्तर देत बसणार नाही, आम्हाला आमची कामं करून द्यावीत, आरोप करताय ते सिद्ध करावं, दरवेळी आरोप करत बसायचे हे लोकशाहीला धरून नाही. सोमय्या हे महाभारतातले शिखंडी आहेत. उच्च न्यायालयात आम्ही रितसर कागदपत्रे दाखवू. किरीट सोमय्यांच्या मागे लागण्याची गरज नाही. जे आरोप केले ते सिद्ध करावं असं आव्हान त्यांनी दिलं.

किरीट सोमय्यांचे आरोप

हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरोपांना उत्तर द्यावं; असं आव्हान किरीट सोमय्यांनी शिवसेनेला दिलं आहे. मुंबईच्या भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार भूखंडाचं श्रीखंड करणारं सरकार आहे. दहिसर येथील जमीन एका बिल्डरने 2 कोटी 55 लाखात घेतली आणि मुंबई महापालिका ९०० कोटीत ती जमीन विकत घेत आहे. मुलुंड येथे 5 हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी 22 एकर जमीन खरेदी करण्याच्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी याबाबत मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. राज्यपालांनी सुमोटो अधिकारातंर्गत तपास करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत. दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणार हे आश्वासन दिले होते, ते मी पाळले. यावर संजय राऊत काहीही बोलायला तयार नाहीत. या व्यवहारांवर हिंमत असेल तर शिवसेनेच्या कोणत्याही प्रवक्त्यांनी भाष्य करावे असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईकिरीट सोमय्याशिवसेनाअनिल परबठाणे