Join us
Daily Top 2Weekly Top 5

लालबागच्या राजाला अकोल्याचे जानव

By admin | Updated: September 5, 2016 09:34 IST

अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणाधीश गणपती. महाराष्ट्रात गणपतीची स्थापना विविध रुपांमध्ये करण्यात येत असली, तरी मुंबईमधील लालबागचा राजा प्रसिद्ध आहे.

अतुल जयस्वाल/ ऑनलाइन लोकमत  
अकोला, दि. ४ -  अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणाधीश गणपती. महाराष्ट्रात गणपतीची स्थापना विविध रूपांमध्ये करण्यात येत असली तरी मुंबईमधील लालबागचा राजा प्रसिद्ध आहे. या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील भाविक मुंबईत हजेरी लावतात. लालबागच्या राजाच्या रुपात अकोल्याचे जानव भर घालते, असे म्हटले तर कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे असून, गत दोन वर्षांपासून येथील श्याम चेंडगे हे लालबागच्या राजाला जानव पाठवतात. यंदाही त्यांनी लालबागच्या राजासह मुंबई व पुण्यातील इतर गणपतींसाठी जानव पाठविले आहे. 
 
दरवर्षी गणेश चतुर्थीला विघ्नहर्ता गणेशाची घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांकडून स्थापना केली जाते. गणपतीची आरास व पूजाविधी मोठ्या काळजीपूर्वक केल्या जातात; परंतु जानव नसले, तर श्रींची पूजा अपूर्णच राहते. जानवे म्हणजे श्रीगणेशाचे वस्त्रच. त्यातही हे जानव शास्त्रोक्त पद्धतीने बनविलेलेच हवे, असे जाणकार सांगतात.  घरांमधील गणेश मूर्तींना जानव घातले जात असले तरी मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींना शास्त्रोक्त जानवे मिळणे कठीण असते.
 
ही बाब हेरून येथील श्याम चेंडगे यांनी वर्ष २०१४ लालबागच्या राजाला जानव पाठविण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळविला व त्यांच्याकडे लालबागच्या राजाला जानवे पाठविण्याची इच्छा व्यक्त केली. पवार यांनीही तात्काळ होकार दिला. तेव्हापासून श्याम चेंडगे हे लालबागच्या राजाच्या १७ फूट उंच मूर्तीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने बनविलेले जानव पाठवितात. 
 
कोल्हापुरला घेतले प्रशिक्षण
गणपतीचे जानव हे साधेसुधे नसते. शास्त्रोक्त पद्धतीचे जानवे हे सुती धाग्यापासून बनविलेले असते. २७ पदरी धागा व ब्रह्मगाठ या शिवाय शास्त्रोक्त जानवे बनत नाही. जानवे बनविण्याचे हे शास्त्रोक्त प्रशिक्षण चेंडगे यांनी कोल्हापूर येथून घेतले आहे.
 
मुंबई, पुण्यातील गणेश मंडळांना पुरविले जाणवे
श्याम चेंडगे यांनी यावर्षी मुंबईतील लालबागच्या राजासाठी तर जानव पाठविलेच आहे. या शिवाय इतर मानाचे असलेले अंधेरीचा राजा, गिरगावचा राजा व मुंबईचा राजा व पुण्यातील तुळशीबागचा राजा या गणेश मूर्तींसाठीही यंदा जानव पाठविले आहे.