Join us  

कोकणचा राजा आला रेSSS... हंगामातील पहिला आंबा सिद्धिविनायक चरणी अर्पण!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 7:40 PM

माघी गणेशोत्सवानिमित्त 'कोकण भूमी प्रतिष्ठान'तर्फे हंगामातील पहिला मुहूर्ताचा आंबा सिद्धिविनायक चरणी अर्पण!

ठळक मुद्देप्रतिष्ठानचा 'ग्लोबल कोकण' विकासाचा संकल्प

मुंबई - कोकण आणि हापूस आंबा यांचे अतूट समीकरण आहे! कोकणात हापूस आंबा तोडणीला सुरुवात झाली असून नैसर्गिकरित्या पिकवलेल्या, सोनेरी रंगाच्या आणि गोडसर सुगंध असणारा 'कोकणचा राजा' अर्थात हापूस आंब्याची चव मुंबईकरांना लवकरच चाखता येणार आहे. हंगामातील पहिला आंबा मुहूर्ताचा आंबा मानला जातो. माघी गणेशोत्सवाचे निमित्त साधत 'कोकण भूमी प्रतिष्ठान'ने मुंबईत हापूस आंब्याची पहिली पेटी आणली. सोमवार १५ फेब्रुवारी रोजी सिद्धिविनायक मंदिराला सायंकाळी भेट देत प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव यांनी बाप्पाच्या चरणी ही पेटी नैवेद्य म्हणून अर्पण केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मुख्य सचिव आणि 'ग्लोबल कोकण'चे मुख्य सल्लागार द. म. सुखथनकर उपस्थित होते. आंब्याची विधीवत पूजा करून पूर्ण हंगाम चांगला जाऊंदे, शेतकरी आर्थिकदृष्टय़ा अधिक प्रगल्भ होउंदे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

कोकणातील आंबे बाप्पा चरणी अर्पण करून यावर्षीपासून संपूर्ण कोकणचा आणि कोकणातील शेतकऱ्यांचा हापूस ब्रँड विकसित करण्याचा संकल्प या मंगलप्रसंगी करण्यात आला. राजश्री यादवराव, सुनैना राओराणे आणि सुप्रिया मराठे या महिला व्यावसायिक तसेच दीपक परब, प्रसाद मालपेकर, नरेंद्र बामने, विकास महाडिक,  संतोष कामेरकर, अभिजित पेडणेकर, उत्तम दळवी, दीपक दळवी, अश्विन परब, कैलास दाते, स्वप्नील एडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मुहूर्ताचा आंबा बाजारात दाखल झाला असला तरी हापूसचा मुख्य आंबा बाजारात यायला थोडा वेळ आहे. ६ डझन आंब्यांच्या पहिल्या पेटीला १५००० रुपयांचा भाव मिळण्याची शक्यता संजय यादवराव यांनी या प्रसंगी वर्तवली. प्रति डझन आंबा फळ हे २५०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. तसेच आंबा उत्पादनाला यावर्षी भरगोस यश मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

विशेष म्हणजे शेतकर्‍यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कोकणातील ५०० शेतकरी एकत्र येऊन लवकरच आंब्यांचा विशेष ब्रँड बाजारात लाँच करणार आहेत. कोकणातील आंबा बागायतदारांना स्वतःची विक्री व्यवस्था उभी करून देत जगभरात कोकणातील हापूस ब्रँड विकसित करण्याच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून 'कोकण भूमी प्रतिष्ठान' कार्यरत आहे. 'आंबा उत्पादक ते ग्राहक' अशी थेट सेवा देणारा 'आंबा महोत्सव' प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित केला जातो. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे हा महोत्सव आयोजित करता आला नाही. आजपर्यंत अनेक शेतकरी आणि बागायतदारांना मोठ्या प्रमाणात लाभ करून देणारा हा महोत्सव या वर्षी लवकरच मुंबईत पार पडणार आहे. विकासाची सर्वाधिक क्षमता असणारे कोकण देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात हातभार लावते. कोकणातील कृषी उत्पादने, काजू, मसाल्याची पिके, हापूस देशाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देतात. केवळ देशात नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात या उत्पादनाची विक्री होते. फलोद्यान, हापूस आंबा, सागरी संपत्ती, पर्यटन उद्योग, कृषी पर्यटन या सगळ्यांचे व्यवस्थित नियोजन केले तर देशातील सर्वांत प्रगत प्रदेश म्हणून कोकणची ओळख होईल. याचसाठी 'कोकण भूमी प्रतिष्ठान' काम करीत आहे. 

टॅग्स :आंबामुंबईसिद्धीविनायक देवस्थान